परभणीतील रस्त्यांच्या प्रश्नी रिपब्लिकन सेना महापालिकेवर धडकली  

गणेश पांडे
Thursday, 24 September 2020

रिपब्लिकन सेनेने शहरातील रस्त्यांची दुरवस्था व अन्य कामांबाबत गुरुवारी राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी महापालिकेसमोर गुरुवारी (ता.२४) प्रचंड घोषणाबाजी केली.
 

परभणी : रिपब्लिकन सेनेने गेल्या तीन वर्षांपासून शहरात केल्या जात असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून या कामांची विभागीय आयुक्त व गुणवत्ता नियंत्रण कार्यालयामार्फत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. रिपब्लिकन सेनेने गुरुवारी (ता.२४) राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडक दिली. या वेळी प्रचंड घोषणाबाजी करून महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आले. या प्रकरणी आयुक्तांना निवेदन दिले.

शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून रस्त्यावरून चालणे जिकरीचे झाले आहे. त्‍यास महापालिकेचा शहर अभियंता विभाग कारणीभूत असून या विभागातील अनेक अभियंते हे अन्य ठिकाणावरून ये-जा करतात. ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहेत.  मर्जीतले नगरसेवक व गुत्तेदारांची कामे होतात व त्यांची मर्जी सांभाळल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणी बोलत नाही. गेल्या तीन वर्षापासून रस्त्याच्या कामासाठी व दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा निधी शासन पाठवते. परंतू, सदरील सर्व रस्ते निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बकाल झाली. त्यामुळे महापालिकेच्या गलथान कारभाराचे वाभाडे निघत आहे.

हेही वाचा - Video- स्वारातीम विद्यापीठामध्ये राज्यव्यापी बेमुदत ठिय्या आंदोलन -

प्रमुख रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा

शहरातील रस्त्यांसह झोपडपट्टीधारक वस्तीत व इतर वस्ती निधीमधून तत्काळ कामे सुरू करण्यात यावीत. दलित वस्तीचा निधी खुल्या प्रभागात वापरण्याचा संदर्भात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. बंद असलेली सार्वजनिक शौचालये सुरू करावी, तुडुंब भरलेल्या नाल्या काढाव्यात, प्रमुख रस्त्यावर मुतारीची व्यवस्था करावी, रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेने महापालिका कार्यालयासमोर निदर्शने करून पालिकेचा मुख्य दरवाजा बंद केला.

येथे क्लिक करापरभणीत लावला सापळा अन् पकडला सोळा लाखांचा गुटखा 

अन्यथा हल्लाबोल मोर्चा काढू  

सर्व कामे वेळेवर सुरू करण्यात आली नाही तर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी दिला. निवेदनावर अशिष वाकोडे, राजकुमार सूर्यवंशी, रवी खंदारे, निलेश डुमणे, हर्षवर्धन काळे, सुमेध भराडे, अमोल लांडगे, आकाश सुतारे, विशाल वाव्हळे ,प्रेमानंद ढगे, अभिनय भारत, पंचशीला  वाघमारे,  शोभा डोंगरे, वैशाली गायकवाड, मीना चोपडे,  रागिनी वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of roads in Parbhani hit the Republican Army Municipal Corporation parbhani news