सहा महिन्यात पूर्ण करणार ड्रायपोर्टचे काम

भास्कर बलखंडे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्पादन निर्यात करण्यासाठी मुंबईला न्यावे लागतात, त्यामुळे उत्पादने पोचण्यासाठी मोठा विलंब होतो. याशिवाय या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर वेळही वाया जात होता. दिरेगाव येथील ड्रायपोर्ट प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उद्योगांना मोठी मदत होणार आहे; तसेच उत्पादन केलेला माल मुंबईला नेण्यास सोयीचे होणार आहे.

जालना -  मराठवाड्यातील पहिल्या ड्रायपोर्ट प्रकल्पाचे काम सहा महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. तशा सूचना जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बुधवारी (ता.15) संबंधितांना केल्या. दरेगाव येथे पाचशे एकरवर जागेवर 'जेएनपीटी'तर्फे ड्रायपोर्ट प्रकल्प आकाराला येत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील उद्योगांना उत्पादनांचे निर्यात करणे सुलभ होणार आहे. 

'जेएनपीटी'चे अध्यक्ष संजय सेठी यांनी बुधवारी ड्रायपोर्टच्या कामाची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पाची कामे सुरू आहेत; या कामांना अधिक गती यावी आणि ते तत्काळ पूर्ण व्हावे यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात याव्यात यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री. सेठी यांनी बुधवारी या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी करून माहिती घेतली.

हेही वाचा : नहारचा घात गावठीच्या गोळीनेच... 

प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत. येत्या सहा महिन्यांत प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले असल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. श्री. सेठी यांच्यासमवेत श्री. दानवे व अन्य अधिकारी यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : नवीन वर्षात तरी बदनापूर बसस्थानक होईल का?

श्री. सेठी म्हणाले, की वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्पादन निर्यात करण्यासाठी मुंबईला न्यावे लागतात, त्यामुळे उत्पादने पोचण्यासाठी मोठा विलंब होतो. याशिवाय या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर वेळही वाया जात होता. दिरेगाव येथील ड्रायपोर्ट प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उद्योगांना मोठी मदत होणार आहे; तसेच उत्पादन केलेला माल मुंबईला नेण्यास सोयीचे होणार आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर श्री. सेठी यांनी बुधवारी या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

भूमिपूजनाला झाली चार वर्षे 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने दरेगाव शिवारात ता. 25 डिसेंबर 2015 मध्ये या ड्रायपोर्टच्या कामाचे भूमिपूजन झाले. या बाबीला चार वर्षे सरूनही ड्रायपोर्ट अजूनही कार्यान्वित होऊ शकलेला नाही. ड्रायपोर्ट कार्यान्वित झाल्यास जालना परिसरातील स्टील कंपन्या, बियाणे उद्योगांना उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया सुलभ करता येईल. त्यामुळे ड्रायपोर्ट सुरू होणे आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Dry Port will be completed in six months