महाशिवआघाडीच्या सत्ताधाऱ्यांचे 'वेट ऍन्ड वॉच' 

भास्कर बलखंडे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

जालना -  येथील जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा पटकाविलेल्या भाजपला रोखण्यासाठी यापूर्वीच महाशिवआघाडीचा प्रयोग झालेला आहे. आता सोडतीनंतर अध्यक्षपदाबाबत पुढील दिशा ठरविली जाणार आहे. त्यामुळे तूर्तास अध्यक्षपदाबाबत पदाधिकारी, स्थानिक नेत्यांनी "वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतलेली आहे. 

जालना -  येथील जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा पटकाविलेल्या भाजपला रोखण्यासाठी यापूर्वीच महाशिवआघाडीचा प्रयोग झालेला आहे. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस ; तसेच कॉंग्रेसची सत्ता आहे. आता अध्यक्षपदाची मुंबईत मंगळवारी (ता.19) सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतर अध्यक्षपदाबाबत पुढील दिशा ठरविली जाणार आहे. त्यामुळे तूर्तास अध्यक्षपदाबाबत पदाधिकारी, स्थानिक नेत्यांनी "वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतलेली आहे. 

भाजपला रोखण्यासाठी आले एकत्र 
गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी होते. भाजपला रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांनी महाशिवआघाडी स्थापन करून जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर अध्यक्षपदावर शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर, तर उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश टोपे विराजमान झाले आहेत. 

हेही वाचा : मित्रांचा गोतावळा, भरली आठवणींची शाळा 

अध्यक्षपदासाठी राहणार स्पर्धा 
येत्या तीन महिन्यांनंतर अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात येईल आणि नवीन कारभाऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे पुढील अध्यक्ष कोण असणार? याचा निर्णय सोडत निघाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष अध्यक्षपद मिळविण्यासाठी स्पर्धेत आहेत; मात्र अध्यक्षपद नेमके कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहते, हे निश्‍चित झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. 

हेही वाचा : गहाण जमिनी सावकाराच्या नावावर 

भाजपही अध्यक्षपदाच्या शर्यतीत 
जिल्हा परिषदेत यापूर्वी भाजप-शिवसेना एकत्र लढलेली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत भाजपही राहील, तशी मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करेल आणि अध्यक्षपदही मिळवेल, असा विश्‍वास भाजपचे जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख यांनी व्यक्‍त केला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत येण्याची शक्‍यता आहे.

झेडपीतील पक्षीय बलाबल
भाजप 22 
राष्ट्रवादी कॉंग्रेस  13
शिवसेना 15 
कॉंग्रेस 
अपक्ष 2

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासासह अनेक लोकोपयोगी कामे केलेली आहेत. आता अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत आहे. हे पद नेमके कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होते, यावरच पुढील दिशा ठरविली जाईल. सोडतीनंतरच हालचाली गतिमान होतील. 
- अनिरुद्ध खोतकर, 
अध्यक्ष, जिल्हा परिषद 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्याही प्रवर्गाला सुटले तरी बहुमत असलेल्या पक्षाकडेच अध्यक्षपद राहील. 
- सतीश टोपे, 
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna ZP