esakal | बीडचा असाही जनता कर्फ्यू : नागरिकांनी घेतले स्वत:च्याच घरात कोंडून
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

निर्मनुष्य रस्ते, दुकाने, व्यापारपेठा बंद आणि घरांचे दरवाजेही बंद असेच काहीसे चित्र रविवारी जिल्हाभरात सकाळच्या सत्रात दिसून आले. अपवाद वगळता रस्त्यावर एखाद - दुसरी दुचाकी दिसून येत होती.

बीडचा असाही जनता कर्फ्यू : नागरिकांनी घेतले स्वत:च्याच घरात कोंडून

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : गर्दीमुळे फैलाव होणाऱ्या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवारी (ता. २२) आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी नागरिकांनी स्वत:च्या घरांचे गेट बाहेरुन लाऊन घेऊन कोंडून घेतले.

निर्मनुष्य रस्ते, दुकाने, व्यापारपेठा बंद आणि घरांचे दरवाजेही बंद असेच काहीसे चित्र रविवारी जिल्हाभरात सकाळच्या सत्रात दिसून आले. अपवाद वगळता रस्त्यावर एखाद - दुसरी दुचाकी दिसून येत होती.

कोरोना विषाणूचा गर्दीमुळे फैलाव होत असल्याने उपाय योजनांचा भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शनिवार (ता. २१) व रविवारी (ता. २२) जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदचे आदेश आहेत. त्याचीही अंमलबजावणी जोरात सुरु असताना रविवारी जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले होते.

याला जिल्हावासियांनी भरभरुन प्रतिसाद दिला. दरम्यान, जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना संशयित रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान, दुबई रिटर्न चौघांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. इतर एक स्वाबचा अहवाल येणे बाकी आहे.

बीड जिल्ह्यात 32 जणांना होम क्वारंटाइन
परदेशातून आलेल्या 17 जणांचा समावेश

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील 32 जणांना होम क्वारंटाइन (घरीच थांबण्याचा सल्ला) करण्यात आले आहे. यात परदेशातून आलेल्या 17 जणांचा समावेश आहे. तर, परवा दुबईहून परतलेल्या महिलेसह तिच्या सहवासात आलेल्या 15 जणांचा समावेश आहे. 

चिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

बीड जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना संशयित रुग्ण आढळला नाही. तरीही विविध उपाय योजना आखण्यात येत आहेत. दरम्यान, दुबईहून परतलेल्या पुण्यातील तिघांसह त्यांची मुलगी आणि चालकाला कोरोनाची बाधा झाली. याच विमानात बीडच्या तिघांनी प्रवास केला होता. तर, मागच्या आठवड्यात शहरातील एक 60 वर्षीय महिला दुबईहुन परतली होती. या चौघांचे स्वाब तपासणीसाठी पाठविले. परंतु, चारही जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला.

आणखी एकाचा स्वाब तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठविला असून त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. आता, परदेशात शिक्षणासाठी व इतर कामांसाठी गेलेले परतत आहेत. आशा 17 जणांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. यासह या महिलेच्या संपर्कात आलेल्या 15 जनांनाही होम क्वारंटाइन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली. 

Janata Curfew In Beed To Fight Coronavirus India Maharashtra News