खाचखळगे पार करीत गुंजचे गोदापात्र जलमय

लक्ष्मीकांत कुलकर्णी
शनिवार, 30 मे 2020

वाळू उपशामुळे गोदावरी पात्रात झालेले मोठमोठे खड्डे, डोह, कुठे चढ, कुठे उतार, कधी उलटा प्रवाह तर कधी पुन्हा पाण्याचा बंधाऱ्यापर्यंत उलटा दाब असे करीत गुंजच्या सुंदरेश्‍वर मंदिराजवळ पाणी आले. 
 

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) -  शिवणगाव (ता. घनसावंगी) येथील बंधाऱ्यातून मंगळवारी (ता. २६) दुपारी बारा वाजता गोदापात्रात १ हजार २०० क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. वाळू उपशामुळे गोदावरी पात्रात झालेले मोठमोठे खड्डे, डोह, कुठे चढ, कुठे उतार, कधी उलटा प्रवाह तर कधी पुन्हा पाण्याचा बंधाऱ्यापर्यंत उलटा दाब असे करीत गुरुवारी (ता.२८) सकाळी नऊ वाजता गुंजच्या सुंदरेश्‍वर मंदिराजवळ पाणी आले.

पाण्याने गोदावरीचे पात्र दुथडी भरले आणि गावासह परिसरातील, पलीकडच्या काठावरील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. रात्री उशिरा पाण्याने गुंजची हद्द असलेली काळुंकावस्ती ओलांडल्यानंतर तब्बल साठ तासांनी बंधाऱ्याचे उघडलेले दरवाजे बंद करण्यात आले. विशेष म्हणजे पाण्याच्या प्रवाहाबरोबर अधिकाऱ्यांचा ताफा हजर होता. 

हेही वाचा : दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

शिवणगाव बंधारा ते गुंज (काळुंकावस्ती) हद्दीपर्यंत नऊ किलोमीटरचे अंतर आहे. तीन तासाला एक किलोमीटर पाण्याचा विसर्ग होता. बंधाऱ्यातून मंगळवारी दुपारी सोडलेल्या पाण्याला शिवणगाव ते भादली चार तास, भादली ते सिरसवाडी डोह चार तास, सिरसवाडी डोह ते हिवरा, गणपती मंदिर तीन तास, सिरसवाडी ते हिवरा रोड चार तास, सिरसवाडी ते म्हसोबा डोह बारा तास, म्हसोबा डोह ते झिरपी ओत बारा तास, झिरपी ओत ते सुंदरेश्‍वर मंदिरापर्यंत आठ तास असे ४७ तासांनंतर पाणी सुंदरेश्‍वर मंदिराजवळ पोचले. त्यानंतर मांजरा खडक आठ तास, मांजरा खडक ते काळुंकावस्ती तीन तास असा ५८ तास पाण्याचा विसर्ग होता. पाण्याचा प्रवाह नागमोडी होता. रिदोरी, भादली, गव्हाणथडी, सिरसवाडी डोह, हिवरा, गणपती मंदिर ओत, सिरसवाडीची डगर, म्हसोबा डोह असा पाण्याचा प्रवाह होता. हिवरा येथील म्हसोबा डोहातून पाण्याला बाहेर पडायला दहा तास लागले तर गणपती मंदिराजवळ तीन तास पाणी थांबले. वाळूच्या खड्ड्यांमुळे कधी कधी प्रवाह उलटा वाहत होता, त्यात गोदावरीतील विहिरी, ओत यामुळे पात्राला उतार नसल्याने थेट बंधाऱ्यापर्यंत प्रवाह तुंबायचा आणि पुन्हा दुप्पट प्रवाहाने पाणी पुढे सरकायचे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

अखेर सात किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पाण्याला ४७ तास लागले आणि सुंदरेश्‍वर मंदिराजवळ गुंज पात्रात पाणी पोचले. त्यानंतर तब्बल ११ तासांनी पाण्याने दोन किलोमीटरची गुंजची शेवटची हद्द ओलांडली. 

अधिकाऱ्यांचा खडा पहारा 

गेल्यावर्षी आंदोलन करून, पाणीपट्टीचे पैसे भरून गुंजकरांना पाणी मिळालेच नाही. या वेळेला मात्र पालकमंत्री राजेश टोपे यांनी कडक भूमिका घेत गुंजच्या शेवटच्या हद्दीपर्यंत पाणी पोचेपर्यंत पाणी बंद करू नका अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. यामुळे पाण्याच्या प्रवाहामागे अधिकाऱ्यांचा ताफा ग्रामस्थांच्या मदतीने पात्र तुडवत रात्रंदिवस फिरत होता. यासाठी शाखा अभियंता भागवत मापारी, उपविभागीय अधिकारी एस. बी. शेख, पी. व्ही. देशपांडे, शाखा अभियंता एम. एस. शेलार, पी. एस. खडसे, श्री. सामे यांनी प्रयत्न केले. पाण्याने गुंजची हद्द ओलांडल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने अधिकाऱ्यांना पाणी पोचल्याचे लेखी पत्र, ठराव देण्यात आला. यावेळी माजी सभापती रघुनाथ तौर, सरपंच भीमराव धनवडे, गजानन तौर, माऊली कचरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे गेट बंद करायला कुठलीही हरकत नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर तब्बल ६० तासांनी रात्री उशिरा बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water in Godavari river at Gunj