esakal | कळमनुरीत विक्रेते, खरेदीदारांनी घेतला मोकळा श्वास
sakal

बोलून बातमी शोधा

kalamnuri photo

भाजीविक्रेत्यासाठी मंगळवारी (ता. ३१) जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर व्यवस्था करण्यात आली. प्रशासनाने आखून दिलेल्या चौकटीत राहून नागरिक व व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार केले.

कळमनुरीत विक्रेते, खरेदीदारांनी घेतला मोकळा श्वास

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : शहरात भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने भाजीविक्रेत्यासाठी मंगळवारी (ता. ३१) जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर व्यवस्था करण्यात आली. प्रशासनाने आखून दिलेल्या चौकटीत राहून नागरिक व व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. त्यामुळे भाजीमंडईमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यास मोठी मदत झाली आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात एक दिवस आड सुरू ठेवण्यात येणाऱ्या किराणा दुकान व भाजी मार्केटमध्ये ठोक भाजीपाला विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी व नागरिकांची गर्दी होत होती. पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांनी या गर्दीला आळा घालण्यासाठी भाजी मंडई मधील खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर हलविण्याकरिता पुढाकार घेतला.

हेही वाचा रेल्‍वे रुळाने पायी चालत राजस्‍थानी मजूरांचा प्रवास

जागा आखून देण्यात आल्या

त्यादृष्टीने त्यांनी पालिका मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांना विनंती केली होती. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भाजीपाल्याची ठोक विक्री, लिलाव करण्याकरिता व किरकोळ स्वरूपात भाजीपाला विक्री करण्याकरिता विक्रेत्यांना जागा आखून देण्याची मागणी केली. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून याठिकाणी भाजी विक्रेत्यांना खरेदी- विक्रीचे व्यवहार करण्यासाठी जागा आखून देण्यात आल्या.

भाजीपाला विक्री करण्यास परवानगी

दरम्यान, मंगळवारी ग्रामीण भागातून दाखल झालेल्या भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाचा लिलाव या ठिकाणी केला. तर शहरातील भाजी मंडई व पोस्ट ऑफिस भागात किरकोळ भाजी विक्रेत्यांना नेहमीच्या ठिकाणी भाजीपाला विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. भाजीमंडई, पोस्ट ऑफिस भागातील भाजीपाला विक्रेत्यांनाही जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जागा आखून देत भाजीपाला विक्री करण्यास परवानगी देण्यात आली.

येथे क्लिक करा -कांदा बीजोत्‍पादनाला अवकाळीचा फटका

फळ विक्री करण्याची व्यवस्था

जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर नागरिकांना मोकळ्या पद्धतीने भाजीपाला खरेदी करता आला. तसेच बसस्थानक परिसरात बसणाऱ्या फळ विक्रेत्यांना बस स्थानकाच्या आतील बाजूला जागा आखून देत याठिकाणी फळ विक्री करण्याची व्यवस्था करून देण्यात आली. किराणा दुकानदारांनीही प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करीत आपल्या दुकानांमधील वस्तूंची विक्री केली.

loading image