जालना : भोकरदनच्या गटारीला का म्हणतात नदी...

दीपक सोळंके 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

केळणा नदी पूर्वी बाराही महिने वाहात होती. मात्र, पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली, परिणामी आता भरपावसाळ्यातही नदी अनेकदा कोरडीठाक असते. यंदा परतीच्या पावसाने साथ दिल्याने तीन ते चार वेळेस नदी दुथडी भरून वाहिली.

भोकरदन (जि.जालना) - शहरालगतच्या केळणा नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पात्रातील पाण्यावर शेवाळ तयार झाले असून नदीपात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे; मात्र नगरपालिका याकडे लक्ष देण्यास तयार नाही. 

हेही वाचा : भोकरदनला उपजिल्हा रुग्णालयाची आस 

शहरातून वाहणाऱ्या केळणा नदी पूर्वी बाराही महिने वाहात होती. मात्र, पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाले, परिणामी आता भरपावसाळ्यातही नदी अनेकदा कोरडीठाक असते. यंदा परतीच्या पावसाने साथ दिल्याने तीन ते चार वेळेस नदी दुथडी भरून वाहिली. या नदीवर स्मशानभूमीजवळ कोल्हापुरी बंधारा उभारलेला आहे.

त्यामुळे नदीचे पाणी अडविले जाते. यामुळे पात्रालगतच्या भागात पाणीपातळीत वाढ होते; परंतु मागील काही दिवसांपासून पात्रात साचलेल्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर शेवाळाचे थर तयार झाले आहे. शिवाय शहरातील सांडपाणी देखील नदीतच सोडण्यात येते. त्यामुळे हिरव्या व काळपट रंगाच्या या पाण्याची दुर्गंधी परिसरात सर्वत्र पसरत आहे. त्यात या घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढू लागली आहे.

व्हायरल क्लिपमधला अमोल कोण... वाचा

आलापूरकडे जाणाऱ्या पुलापासून ते खडकेश्वरपर्यंतच्या नदीपात्राला तर मोठ्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्रालगतच्या रहिवाशांना दुर्गंधीमुळे राहणे कठीण झाले असून, घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रश्नी नगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. 

डासांची वाढ 

नदीपात्रातील घाणीमुळे शहरात डासांची उत्पत्ती वाढल्याचे चित्र आहे. सतत बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असून, पात्रातील घाणीमुळे रोगराई पसरण्यास भीती निर्माण झाली आहे.

नदी संवर्धनाची गरज 

नदीपात्रातील घाण, काटेरी झाडेझुडपे, कचऱ्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेसह विविध राजकीय संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व नागरिकांनी देखील नदी संवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नदीचे खोलीकरण, सरळीकरण व शुद्धीकरण झाल्यास याचा शहराला मोठा फायदा होईल. 

भोकरदन शहरातील सांडपाणी नदीपात्रात सोडल्या जाते. कचरा, जागोजागी साचलेल्या घाण पाण्यात वराह, मोकाट कुत्रे भरून शहरातील गल्यांमध्ये इकडून तिकडे फिरतात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो. याकडे नगरपालिकेने तत्काळ लक्ष द्यावे. 
- महेश पुरोहित, शिवसेना शहरप्रमुख, भोकरदन 

नदीपात्रातील वाढत्या घाणीमुळे शहरात साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. नदीपात्राच्या परिसरातील रहिवाशांना याचा अधिक त्रास होत आहे. याविषयी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नदी स्वच्छतेची मागणी करणार आहे. 
- दीपक बोर्डे, नगरसेवक, भोकरदन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kelna River In Bhokardan Jalna News