esakal | समाधानकारक पावसाने खरीपीच्या खोळंबलेल्या पेरण्या उरकल्या
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

समाधानकारक पावसाने खरीपीच्या खोळंबलेल्या पेरण्या उरकल्या

sakal_logo
By
जलील पठाण.

औसा (लातूर): जूनमध्ये तुरळक ठिकाणी पडलेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बियाण्याची पेरणी केली खरी मात्र नंतर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पेरलेली पीके माना टाकू लागली तर चाळीस टक्के पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट गडद होत असतानाच गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आणि सलाईनवर आलेली पिके तारारली तर उरलेल्या पेरण्याही शेतकरी करू लागल्याने शेतकऱ्यांत समाधान झाले आहे.

सतत दुष्काळाशी सामना करणाऱ्या औसा तालुक्याला खरा आधार आहे तो खरीप पीकांचा. एकूण एक लाख एकवीस हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास एक लाख दहा हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होते. यामध्ये सर्वाधिक पेरा साठ ते सत्तर हजार हेक्टर सोयाबीन पिकाचा असतो त्या पाठोपाठ तूर, मूग, उडीद, संकरित ज्वारी, भुईमूग आदी खरीप पिके घेतली जातात. यंदा ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीनचा पेरा कमी होणार आहे. जूनच्या सुरुवातीला तालुक्याच्या कांही भागात पेरनियोग्य पाऊस पडला. या पावसावर अनेकांनी पेरण्या उरकल्या. मृगात पेरणी झालेली पिके जोमदार येतात आणि रोग कीड कमी होऊन भरघोस उत्पादन मिळत असल्याने कांही शेतकऱ्यांनी पुरेशी ओल नसतानाही बियाणे पेरण्याचे धाडस केले.

हेही वाचा: नांदेडमध्ये गुन्हे शाखेने आठ लाखांचे ५१ मोबाईल काढले शोधून

अनेक भागात पाऊस नसल्याने घरात खत बियाणे असतांनाही शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यावर पेरणी करायची या आशेवर थांबले होते. मात्र नंतर पावसाने पाठ फिरविली आणि उगवलेली पिके पाण्याअभावी कोमेजू लागली. ज्यांच्याकडे तुषार सिंचनाने पाणी देण्याची व्यवस्था आहे त्यांनी तुषार पद्धतीने पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना पाऊस नसल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय अशी भीती वाटत असतांनाच गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने कोमेजू लागलेली पिके तरली तर खोळंबलेल्या पेरण्याही उरकल्या आहेत.

हेही वाचा: तरुणाची आत्महत्या, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

मंगळवारी (ता.13) रोजीची औसा तालुक्यातील पावसाची आकडेवारी ः औसा - 11 मिमी, भादा- 05, किल्लारी- 16, लमजना -12, मातोळा -11, किनीथोट- 10 तर बेलकुंड- 04 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत तालुक्यातील सातही महसूल मंडळात 1836 मिमी पाऊस पडला आहे.

loading image