‘कोरोना’च्या चाचणीसाठी परभणीत प्रयोगशाळा शक्य

file photo
file photo

परभणी : सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी परभणीत सोय व्हावी यासाठी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेतला असून प्रयोगशाळा मान्यतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाकडे मंगळवारी (ता. ३१) पाठविला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी दिली.


परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग कार्यरत आहे. या विभागात अनेक तज्ज्ञ चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. सध्या ‘कोरोना’चे संकट आहे. त्यामुळे ‘कोरोना’च्या चाचणीसाठी प्रयोगशाळांची कमतरता भासू लागली आहे. सध्या मराठवाड्यात एकाही ठिकाणी प्रयोगशाळा नसल्याने संशयितांचे स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठवावे लागतात. त्यासाठी वेळेसह पैसेही खर्च होतो. त्यामुळे अशा संकट काळात आणि भविष्यातील धोका लक्षात घेता परभणीत चाचणीची सोय उपलब्ध व्हावी यासाठी पशू व मत्स्य विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासंदर्भात पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय व विभागप्रमुख डॉ. आनंद देशपांडे यांनी  जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन यावर चर्चा केली होती. 


आरोग्य सचिवांकडे प्रस्ताव दाखल
महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत सुसज्ज अशी जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी रोगनिदानविषयक सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या विभागातील शास्त्रज्ञ सातत्याने विषाणूविषयक संशोधन करण्यामध्ये तसेच प्राण्यांच्या साथीच्या रोगांचे निदान करण्यामध्ये तज्ज्ञ असल्याचे या चर्चेतून समोर आले. त्यामुळे  जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी प्रयोगशाळेच्या बळकटीकरणाबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे महाविद्यालयास  सूचविले होते. त्यानुसार डॉ. मार्कंडेय यांनी हा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी मुगळीकर यांना सादर केला. तो प्रस्ताव मंगळवारी (ता. ३१)  आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांकडे सादर केला आहे. 

८१ लाख ६४ हजारांचा प्रस्ताव
यानुषंगाने उपलब्ध असलेला तांत्रिक कर्मचारी वर्ग आणि लागणारी यंत्रसामुग्री यासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये मुख्य चाचणीसाठी लागणारे एक आरटीपीसीआर यंत्र, नमुने हाताळणी, चाचणीसाठी आवश्यक असलेले यूव्ही-स्पेट्रो फोटो मीटर, वातानुकूलित यंत्र, डिफ्रीजर आदींसह विविध बाबींसाठीचा ५२ लाख आठ हजार रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. एका वर्षासाठी लागणाऱ्या रसायनाचा खर्च २२ लाख रुपये, तर मनुष्यबळासाठी सहा लाख ८४ हजार, असा एकूण ८१ लाख ६४ हजार रुपयांचा हा प्रस्ताव आहे.
 तज्ज्ञांची मिळणार साथ
 सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद देशपांडे यांना या क्षेत्रातील संशोधनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे. डॉ. सतीश गायकवाड यांना दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तीन वर्षे कामाचा अनुभव आहे. तर शिकागो (अमेरिका) येथे चार वर्षे संशोधनाचा अनुभव असलेले डॉ. प्रभाकर घोरपडे या तीन शास्त्रज्ञांची टीम उपलब्ध असून ‘कोरोना’च्या सुविधेसाठी काम करण्याची तयारी या तिघांनीही दर्शविली आहे.
 

दररोज किमान ३०० चाचण्या 
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात अनुभवी तज्ज्ञांच्या सहायाने ‘कोरोना’ विषाणूची चाचणी घेता येऊ शकते. प्रस्ताव मंजूर झाल्यास दररोज किमान ३०० चाचण्या होऊ शकतात.
- डॉ. नितीन मार्कंडेय, प्राचार्य,पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com