esakal | उमरग्यातील विदारक चित्र; 'रेन्डीमसीव्हर' इंजेक्शन मिळेना !
sakal

बोलून बातमी शोधा

medicine.jpg
  • कोरोनाबाधित गंभीर रूग्णावर उपचार करतांना अडचणी, 
  • सरकारीसह खाजगी कोविड रुग्णालयात उपलब्ध नाहीत इंजेक्शन. 

उमरग्यातील विदारक चित्र; 'रेन्डीमसीव्हर' इंजेक्शन मिळेना !

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रूग्ण संख्याही दुपटीने वाढत आहे. दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना अतिदक्षता कक्षात उपचार करावे लागताहेत. मात्र रूग्णाची प्रकृती तातडीने बरी करण्यासाठी रेन्डीमसीव्हर इंजेक्शनचा डोस महत्वाचा ठरत असताना शहरातील सरकारी व खाजगी रूग्णालयात इंजेक्शनचा तुटवडा वारंवार निर्माण होत असल्याने नातेवाईकांना आगाऊ खर्च करून सोलापूर व लातूर येथे इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी धावपळ करावी लागत आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाची भिती प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे, त्याला हजारो लोकांनी सुरक्षितता जपून दूर केली असती तरी संसर्ग वाढत चालल्याने विशेषत : जेष्ठ नागरिकांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत शहर व तालुक्यात ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एक हजाराहुन अधिक व्यक्तीही बऱ्या झालेल्या आहेत. सध्या उमरग्यात सरकारी कोविड रूग्णालयात आयसूलेशन कक्षात ऑक्सीजन पुरवठा करणारी सुसज्ज यंत्रणा कार्यरत आहे मात्र गंभीर रुग्णांसाठी आधार ठरणाऱ्या रेन्डीमसीव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईकांना इतरत्र धावपळ करावी लागत आहे. सध्या खाजगी कोविड रुग्णालयाच्या औषधी दुकानात गेल्या चार दिवसापासून इंजेक्शन मिळत नाहीत. त्यामुळे सोलापूर व लातूरला जाऊन येण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सरकारी रुग्णालयात अत्यल्प पुरवठा
सरकारी कोविड रूग्णालयात रेन्डीमसीव्हर इंजेक्शनचा अत्यल्प पुरवठा होतो. रुग्णालयाने शंभरची मागणी केली तर दहा ते बाराच इंजेक्शन मिळत आहेत. कोरोना बाधित व्यक्तीला निमोनिया असेल तर त्याला तातडीने या औषधोपचाराची गरज भासते मात्र वरिष्ठ पातळीवरून पुरवठाच कमी असल्याने बाहेरून इंजेक्शन मागवावे लागतात. गेल्या चार दिवसापासुन शहरातील दोन औषधी दुकानात हमखास मिळणारे इंजेक्शन उपलब्ध नाही. त्यामुळे सोलापूर व लातूरला जाऊन औषध घेऊन यावे लागत आहे. एका रुग्णाला गरजेनुसार सहा इंजेक्शनचा डोसं द्यावा लागतो त्यासाठी जवळपास तीस हजार रुपये मोजावे लागतात. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या संदर्भात खाजगी कोविड रुग्णालयात चौकशी केली असता ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरून औषधाची मागणी केली आहे. मात्र वेळेत इंजेक्शन मिळत नसल्याचे सांगण्यात आले. सरकारी कोविड रुग्णालयात मोजकेच इंजेक्शन असतात. एका इंजेक्शनची किंमत चार ते सहा हजारापर्यंत असल्याने त्याचा पुरवठा कमी होतो आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रेन्डीमसीव्हर इंजेक्शनची उपलब्धता अधिक प्रमाणात राहिली तर रुग्णांवरील उपचार वेळेत होईल शिवाय सामान्य कुटुंबातील नातेवाईकांचा आर्थिक भुर्दंड वाचेल.


" कोरोना बाधितावर डॉक्टर्स, कर्मचारी धोका पत्करून उपचार करीत आहेत. मात्र अत्यावश्यक असलेल्या रेन्डीमसीव्हर इंजेक्शनची उपलब्धता नसणे रुग्णांसाठी धोक्याचे ठरत आहे. सरकारी रुग्णालय प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याबाबत दक्ष राहुन अधिक इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.

अशोक बनसोडे, अध्यक्ष संविधान विचारमंच

(संपादन-प्रताप अवचार)