जमीन देतो म्हणून मुंबईच्या व्यापाऱ्याला १५ लाखाला फसवले, लातुरात एकावर गुन्हा दाखल

हरि तुगावकर
Thursday, 5 November 2020

लातूर येथील नांदेड रस्त्यावर असलेल्या सुपर स्पेशालिटी परिसरात जमिन देतो म्हणून मुंबईच्या एका व्यापाऱ्याला १५ लाखाला फसवले गेले आहे.

लातूर  : लातूर येथील नांदेड रस्त्यावर असलेल्या सुपर स्पेशालिटी परिसरात जमिन देतो म्हणून मुंबईच्या एका व्यापाऱ्याला १५ लाखाला फसवले गेले आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता.पाच) येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई येथील व्यापारी भूषण काबरा यांचा व्यापार लॉकडाऊनमुळे ठप्प होता. त्यामुळे इतर कोणत्या तरी व्यवसायात पैसे गुंतवणुकीसाठी त्यांनी शोध सुरु केला होता.

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या विरोधातील तक्रार आमदार पवारांनी घेतली मागे

यात त्यांची बिलाल शेख (रा.मुंब्रा) याच्याशी पहिल्यापासून ओळख होती. पैसे गुंतवणुकीचा विचार त्यानी शेख याला सांगितला. शेख याने ही माहिती लातूरच्या विष्णु बेडगे याला दिली. बेडगे याने बाळासाहेब भोसले याच्याशी संपर्क साधला. भोसले याची येथील नांदेड रोड परिसरात असलेल्या सुपर स्पेशालिटी परिसरात जागा असून ती विकायची आहे. येताना वीस लाखांचे डीडी घेवून येण्याचा निरोपही श्री. काबरा यांना देण्यात आला. श्री. काबरा हे ता.चार आॅक्टोबर रोजी येथे पंधरा लाखांचा एक व पाच लाखांचा एक असे दोन डीडी घेऊन आले. येथील एका ल़ॉजवर ते थांबले. तेथे भोसले याला त्याने काबरा यांच्याकडून दोन्ही डीडी घेतले. हे डीडी खोटे आहेत की खरे या करीता आपण बँकेत जाऊ असे त्याने सांगितले.

वाहनांवर दगडफेक करीत चालकांना लुटले, औसा-तुळजापूर महामार्गावरील घटना

काबरा यांना गाडीतच बसवून भोसले हा डीडी लावण्यासाठी बँकेत गेला. थोड्या वेळानंतर तो परत आला. बँकेत सध्या अडचण असल्याने आपल्याला नंतर माहिती मिळेल आपण जागा पाहून येऊ असे त्याने काबरांना सांगितले. त्यानंतर नांदेड रोडला नेऊन गाडीतूनच एक रिकामी जागा त्याना दाखवण्यात आली. ही जागा आपलीच आहे असे भोसले याने त्यांना सांगितले. दोन दिवस झाले तरी व्यवहार काही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर श्री.काबरा यांनी बँकेत विचारणा केली असता त्यांचा पंधरा लाखाचा डीडी भोसले याने आपल्या खात्यात जमा केल्याचे त्यांच्या लक्षात आले. उर्वरित पाच लाखाचा डीडीचे पेमेंट बंद करण्याची सूचनाही त्यांनी बँकेला केली. यात भोसले याने आपली पंधरा लाखांची फसवणूक केली असल्याची फिर्यादी काबरा यांनी दिल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Land 15 Fraud Happened With Trader Latur News