
तालुक्यातील मोरगव्हाण येथे मित्राच्या गावी आलेल्या हिंगोली येथील तीन युवकांचा इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. इसापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये दोन तासांच्या शोधानंतर तीनही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.
कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील मोरगव्हाण येथे मित्राच्या गावी आलेल्या हिंगोली येथील तीन युवकांचा इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. सात) दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर मच्छीमार व ग्रामस्थांच्या मदतीने तीन तासांनंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हिंगोली येथील निखील बोलके या मित्राच्या मूळ गावी मोरगव्हाण येथे त्याचे मित्र योगेश गडप्पा (वय १८), शिवम चोंडेकर (वय २३), रोहित चित्तेवार (वय १७) दुचाकीवरून आले होते. त्यानंतर त्यांनी मोरगव्हाण गावालगत असलेल्या इसापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहोण्याचा आग्रह धरला.
हेही वाचा - लॉकडाउनमध्ये दीड लाख लाभार्थींना ‘शिवभोजन’चा आधार
तिघेही पाण्यात बुडाले
यामध्ये केवळ रोहित चित्तेवार या युवकाला पोहता येत होते. या वेळी योगेश गडप्पा, शिवम चोंडेकर हे पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले. मात्र, खोल गेल्यानंतर दोघांनाही काठाकडे परत येता येत नसल्यांने त्यांनी आरडाओरडा केला. दोघा मित्रांच्या मदतीला रोहित चित्तेवार याने पाण्यात उडी घेतली. मात्र, मदतीला गेलेल्या रोहितला पाण्यात बुडत असलेल्या दोन्ही मित्रांनी धरल्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले.
प्रशासनाला दिली माहिती
काठावर असलेल्या निखील बोलके व अन्य एका मित्राने आरडाओरडा करून या प्रकाराची माहिती आजूबाजूच्या ग्रामस्थांना दिली. मात्र, परिसरातील ग्रामस्थ येईपर्यंत तिघेही मित्र पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती कळमनुरी पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे व तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांना दिली.
अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल
त्यानंतर तातडीने पोलिस निरीक्षक श्री. भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, गणेश सूर्यवंशी, निरंजन नलवार, संदीप पवार, शिवाजी देमगुंडे, नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, मंडळ अधिकारी श्री. डाखोरे, तलाठी गंगाराम बेले, श्री. सोनटक्के, वाठोरे घटनास्थळी दाखल झाले.
येथे क्लिक करा - जात पाहून पीककर्ज देणार का ? शेतकरी संतप्त
पाण्यात युवकांचा शोध सुरू
त्यांनी तातडीने मच्छीमारी करणाऱ्या व पट्टीच्या पोहणाऱ्या नागोराव पाईकराव, वसंता पाईकराव, जोतिबा खंदारे, अमोल खंडारे, संभाजी खंदारे (रा. शेनोडी), काळूराम बोलके, दिलीप पाटील (रा. मोरगव्हाण) तुळशिराम भिसे, विठ्ठल भिसे (रा. ढोलक्याची वाडी), समशेर पठाण, अप्पाराव कदम, कांता पाटील यांच्या मदतीने पाण्यात युवकांचा शोध सुरू केला.
दोन तासांच्या शोधानंतर तीनही युवकांचे मृतदेह
या वेळी जिल्हा परिषदेचे कर्मचारी सुधीर आप्पा कोंडेकर यांचा मुलगा असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोज आखरे, सभापती फकीरराव मुंडे, कर्मचारी संघटनेचे संतोष बांगर, संजय सदावर्ते, भास्कर देशमुख, राम मुंडे यांच्यासह अनेक जण मोरगव्हाण येथे दाखल झाले. इसापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये दोन तासांच्या शोधानंतर तीनही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर तीनही मृतदेहांचे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, तिघेही वर्गमित्र असलेल्याची माहिती आहे.