अमित देशमुखांच्या धक्कातंत्राने भाजप घायाळ

हरी तुगावकर
Saturday, 23 November 2019

  • अडीच वर्षांतच परतफेड
  • भाजप फोडून कॉंग्रेसचा महापौर
  • कॉंग्रेसच्या मतांवर भाजपचा बंडखोर उपमहापौर 

लातूर : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. भाजपचा दावा असलेली ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर रडण्याची वेळ आली. तशीच काही परिस्थिती लातूर महापौरपदाच्या निवडणुकीत देशमुख यांनी धक्कातंत्राचा वापर करून भाजपच्या नगरसेवकांवर आणली.

महापालिकेत भाजपचे बहुमत असूनही कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौरपदी विराजमान झाले. उपमहापौरपदाची खेळीही देशमुख यांनी यशस्वी करून दाखविली. कॉंग्रेस नगरसेवकांच्या मतावर भाजपचे बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांना त्यांनी उपमहापौरपदी बसविले. राज्यात सत्तेत अशाच पद्धतीने होत असलेला बदल आता लातूरकरही आपल्या शहरात अनुभवणार आहेत. 

भाजपचे 36, कॉंग्रेसचे 33

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप नेते, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला बहुमत मिळाले होते. सत्तर सदस्यीय महापालिकेत भाजपचे 36, कॉंग्रेसचे 33, तर तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक असे संख्याबळ आहे. त्यावेळी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले सुरेश पवार यांना श्री. निलंगेकर यांनी महापौरपदी बसवून देशमुख यांच्यावर एकप्रकारे मात केली होती. त्याची सल देशमुख यांच्या मनात तेव्हापासूनच होती. या निवडणुकीत त्यांनी ही सल सव्याज परत केली आहे. गेल्या अडीच वर्षांत भाजपमधील गटबाजी सातत्याने दिसून आली आहे. त्यात काही नगरसेवक निलंगेकर यांचे समर्थक, तर काही नगरसेवक आमदार अभिमन्यू पवार यांचे समर्थक हे चित्रही लातूरकरांना पाहायला मिळाले. देशमुख हे संधीचीच वाट पाहत होते.

असं कसं झालं - सत्ता भाजपची, महापौर मात्र कॉंग्रेसचा

महापौर निवडीच्या निमित्ताने ही संधी चालून आली. त्यात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना असे सरकार येऊ पाहत आहे. त्यात महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लागली. देशमुख गेली दोन दिवस बाभळगाव मुक्कामी होते. महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे कॉंग्रेसकडून ऍड. दीपक सूळ, विक्रांत गोजमगुंडे, सचिन बंडापल्ले हे इच्छुक होते. प्रत्येकाशी देशमुख यांनी चर्चा केली. फोडाफोडीच्या राजकारणात कोण सरस ठरतो हे जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी विक्रांत गोजमगुंडे यांच्यावर विश्वास टाकला. त्यांनीही तो सार्थ ठरवीत भाजपकडील सत्ता कॉंग्रेसकडून खेचून आणली. बहुमत असूनही सत्ता गेल्याने भाजपच्या नगरसेवकावर रडण्याचीच वेळ आली. 

हेही वाचा - शेतकऱ्यांना नावे दिली पोएट्री, सॅटिस्फॅक्शन, ग्रॅण्डफादर

महापौरपदासाठी कॉंग्रेसचे गोजमगुंडे, भाजपचे ऍड. शैलेश गोजमगुंडे यांच्यात लढत झाली. त्यात गोजमगुंडे यांनी कॉंग्रेसच्या 32 मतांसह राष्ट्रवादीला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत गेलेले राजा मणियार; तसेच भाजपचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार व गीता गौड अशी एकूण 35 मते घेत विजय मिळविला. 

बेरजेचे राजकारण 

उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही देशमुख यांनी बेरजेचे राजकारण खेळले. कॉंग्रेसचा उमदेवार न देता त्यांनी कॉंग्रेसला साथ देणारे भाजपचे बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांना उमेदवारी दिली. कॉंग्रेसच्या मतांवर बिराजदार विजयी झाले. त्यांना 35 मते मिळाली. मतदानाच्या वेळी भाजपच्या शंकुतला गाडेकर निघून गेल्याने भाजपच्या भाग्यश्री कौळखेरे यांना 32 मते घेत पराभव स्वीकारावा लागला आहे. एकूणच या राजकीय खेळीत देशमुख यांनी सध्या तरी निलंगेकर यांच्यावर बाजी मारली आहे, अशी चर्चा सुरू झाली. 

आता स्थायी समितीवर लक्ष 

महापालिकेत स्थायी समितीला खूप महत्त्व आहे. अर्थकारणाशी ही समिती संबंधित आहे. सध्या या समितीवर भाजपचे आठ, कॉंग्रेसचे आठ असे 16 सदस्य आहेत. त्यामुळे दरवेळेस चिठ्ठी काढून सभापती निवडला जात आहे. सध्या भाजपचे दीपक मठपती हे सभापती आहेत; पण या समितीवर चंद्रकांत बिराजदार हेही आहेत. सध्या बिराजदार हे कॉंग्रेसच्या गोटात येऊन बसले आहेत. उपमहापौर झाले आहेत. त्यामुळे आता कॉंग्रेसचे या समितीवर लक्ष आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur amit deshmukh shocked Bjp