esakal | CORONA BREAKING : लातूरात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, एकूण कोरोना बळींची संख्या १७ वर 
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

लातूरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान सोमवारी (ता. २९) मृत्यू झाला. याबाबतची अधिकृत माहिती आज (ता. ३०) दुपारी जाहीर करण्यात आली.

CORONA BREAKING : लातूरात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, एकूण कोरोना बळींची संख्या १७ वर 

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : लातूरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान सोमवारी (ता. २९) मृत्यू झाला. याबाबतची अधिकृत माहिती आज (ता. ३०) दुपारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे लातूर जिल्ह्यात आजवर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यात सध्या १२० रुग्ण उपचार घेत असून आजवर २०० रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे आणि कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारूती कराळे यांनी दिली.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आजवर ११ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर उदगीरमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या या १७ पैकी १५ व्यक्ती ज्येष्ठ नागरिक होत्या. त्यांना अतिताण, मधुमेह, ह्रदयरोग, मुत्रपिंड प्रत्यारोपण अशा विविध आजारांचा सामना करावा लागत असतानाच कोरोनाची लागण झाली होती. उर्वरित दोनजण हे तरूण होते. त्यापैकी एकाचे मुत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. तर दुसऱ्याची प्रतिकार शक्ती कमी होती. कोरोनाची लागण झाल्याने संस्थेत २५ जून रोजी सारोळा (ता. औसा) येथील ज्येष्ठ नागरिकाला दाखल करण्यात आले होते. त्यांना दमा होता. पहिल्या दिवसापासून त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. त्यांचा सोमवारी (ता. २९) मृत्यू झाला.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना लातूर शहरात ५, औसा तालुक्यात ६ आणि उदगीरमध्ये १, असे १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लातूर जिल्ह्यात सोमवारी (ता. २९) आढळून आले. या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण १७९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील १४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ११ जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत तर १२ जणांचा अहवाल रद्द झाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या या व्यक्ती शहरातील झिंगनप्पा गल्ली (१), मोती नगर (१), श्याम नगर (२), उदगीर तालूक्यातील वाढवणा (१), औसा तालूक्यातील माळकोंडजी (१), सारोळा (५) आणि बिदर जिल्ह्यातील हुसनाळ (१) येथील आहेत, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
 

loading image