Corona Update : लातूरपाठोपाठ आता औशाची चिंता वाढली, ३४ पॉझिटिव्हची भर 

सुशांत सांगवे
Thursday, 2 July 2020

वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यातील निलंगा, उदगीर या तालुक्यानंतर लातूर शहर आणि आता औसा तालुक्याची चिंता वाढली आहे. दिवसभरात जिल्ह्यात ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळेल असून त्यातील औसा येथील तब्बल १७ आणि लातुरातील १२ रुग्ण आहेत. उर्वरित पाच रुग्ण हे उदगीर (२) आणि अहमदपूर (३) तालुक्यातील आहेत.

लातूर : वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यातील निलंगा, उदगीर या तालुक्यानंतर लातूर शहर आणि आता औसा तालुक्याची चिंता वाढली आहे. दिवसभरात जिल्ह्यात ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळेल असून त्यातील औसा येथील तब्बल १७ आणि लातुरातील १२ रुग्ण आहेत. उर्वरित पाच रुग्ण हे उदगीर (२) आणि अहमदपूर (३) तालुक्यातील आहेत.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील १८४ स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी १४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १० जणांचे अहवाल अनिर्णित आहेत. लातुरातील ९७ पैकी १२ पॉझिटिव्ह, औसा येथील ५८ पैकी १७ पॉझिटिव्ह, उदगीरमधील १८ पैकी २ पॉझिटिव्ह, अहमदपूरमधील ८ पैकी ३ पॉझिटिव्ह असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. पॉझिटिव्ह अहवाल आलेले लातुरातील झिंगणप्पा गल्ली, लेबर कॉलनी, सुळ गल्ली, केशव नगर, नारायण नगर, शिव नगर, नरसिंह नगर येथील तर औसा तालुक्यातील सारोळा येथील १५, माळकोंडजी येथील १, आलमला येथील १ असल्याचे जाहीर करण्यात आले. उर्वरीत पॉझिटिव्ह व्यक्तींची माहिती लवकरच जाहीर होणार आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

५ जणांना डिस्चार्ज; ७ रुग्णांची प्रकृती गंभीर

आज ५ रूग्णांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी एक रुग्ण १२ दिवस व्हेंटिलेटरवर होते व त्या रुग्णास मधुमेह होता. उर्वरीत २ रुग्ण ५ दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यांना इतर आजार नव्हते, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. राम मुंढे यांनी दिली. संस्थेतील रुग्णालयात सद्यस्थितीत एकूण ४८ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असून त्यापैकी २६ रुग्ण कोरोना विलगीकरण कक्षात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच, २२ रुग्ण कोरोना अतिदक्षता विभागात असून त्यापैकी ७ रुग्णाची प्रकृती गंभीर आहे व उर्वरीत रुग्णांची प्रकृती सद्यस्थितीत ठीक आहे, असेही ते म्हणाले.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

लातूरातील रुग्णाचा पुण्यात मृत्यू

लातूरातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकुण संख्या १८ झाली आहे. संबंधीत रुग्ण हे ३९ वर्षांचे असून लातूरातील सरस्वती कॉलनी भागात राहत होते. त्यांचा १५ जून रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना किडनीचाही आजार होता. उपचारादरम्यान त्यांचा २८ जून रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची नोंद आज (ता. १) लातूरात झाली. याआधी लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ११, उदगीरमधील उपजिल्हा रूग्णालयात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

कोरोना मीटर

एकूण बाधित : ३९३
उपचार सुरू असलेले : १६९
बरे झालेले : २०६
मृत्यू : १८
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur corona Update 34 new corona positive patient