चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी केला पाठलाग; पण हाती लागले रिकामे एटीएम, सतरा लाखही चोरीला

प्रशांत शेटे
Wednesday, 17 February 2021

चाकूर शहरात मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. वरिष्ठ अधिकारी ही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

चाकुर (जि.लातूर) : शहरातील लातूर-नांदेड रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी असलेली एटीएम मशिन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता.१७) पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. चोरट्यांच्या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केला. परंतू गुंगारा देऊन सोळा लाख ७० हजार रूपये घेऊन चोरटे पसार झाले आहेत. एटीएमची रिकामी मशीन पोलिसांच्या हाती लागली आहे.

वाचा :रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईजवळ बसून चिमुकले बहीण-भाऊ दिवसभर रडले, बापाच्या कृत्याने शेजारी गेले चक्रावून

चाकूर शहरात मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. वरिष्ठ अधिकारी ही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. लातूर-नांदेड रस्त्यावरील त्रिमुर्ती चौकात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएममध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास तीन ते चार व्यक्ती एटीएम मशिन चोरून नेत होते. शेजारच्या महिलेने आरडा ओरड केल्यानंतर चोरट्यांनी एटीएम मशीन वाहनात टाकून पळ काढला. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चाकूर व अहमदपूरच्या पोलिसांनी चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग केला.

वाचा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मावशीचे निधन, वीस मिनिटांची भेट ठरली शेवटची

सुनेगाव सांगवी (ता.अहमदपुर) जवळील पुलाच्या खाली एटीएम मशीन टाकून त्यातील पैसे घेऊन चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा दिला. एटीएम मशिनमध्ये मंगळवारी सायंकाळी पैसे भरण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विद्यानंद काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी भेट दिली.

वाचा : टुलकिट प्रकरण: वाॅरंट नसताना दिल्ली पोलिसांनी घरातील साहित्य जप्त केले, शंतनू मुळूकच्या वडिलांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

सुनेगाव सांगवी येथे स्थानिक रिकामे एटीएम मशिन सापडले असून या ठिकाणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. याबाबत सचिन चौधरी यांनी १६ लाख ७० हजार रूपयाची रक्कम चोरीला गेली असल्याची तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटेपासून पोलिसांच्या सर्व यंत्रणा याचा तपास करीत असल्या तरी पोलिसांच्या हाती काहीही लागलेले
नाही.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Crime News Police Get Empty ATM Machine, Seventeen Lakh Stolen In Chakur