दिवाळीदिनी ९८ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई, लातूर जिल्ह्यातील चित्र! 

विकास गाढवे
Saturday, 14 November 2020


उर्वरित निधी आल्यानंतर राहिलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीनंतर मदतीची शक्यता 

लातूर : जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने मंजूर केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील मदतीचा १२९ कोटी ५० लाख नऊ हजार रुपयांचा निधी सोमवारी (ता. नऊ) उपलब्ध केला. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून हा निधी मंगळवारी (ता. दहा) येताच जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने तहसील कार्यालयांना निधी वर्ग केला. यामुळे बँकांना दिवाळीच्या सुट्या लागण्यापूर्वीच भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. दहा) निधीपैकी ९८ टक्क्यांहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिवाळीनंतर भरपाई मिळण्याची शक्यता आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी व पुरामुळे काढणीला आलेली पिके, जमिनी व घरांचे मोठे नुकसान झाले. सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाने युद्ध पातळीवर पंचनामे करून सरकारकडे भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) निकषानुसार प्रशासनाने निधी मागणी केली तरी सरकारने जिरायती पिकांसाठी हेक्टरी दहा तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये भरपाई मंजूर केली. त्यानुसार सरकारने निधी मंजूर केला व आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन सोमवारी तो विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला. दिवाळीपूर्वी शेतकरी व बाधितांना भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर निधी आल्याने तो दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याबाबत शाशंकता व्यक्त केली जात होती. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मात्र निधी येताच तो शेतकऱ्यांच्या तातडीने खात्यावर जमा करण्याचे नियोजन केले होते. त्याची पूर्वतयारीही करून ठेवली होती. यामुळे आयुक्त कार्यालयाकडून मंगळवारी निधी येताच तो तातडीने तहसील कार्यालयांना वर्ग केला. तहसील कार्यालयांनी मराठी मुळाक्षराच्या क्रमानुसार आधीच गावांची निवड करून ठेवल्याने निधी येताच शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्यास सुरवात केली. पूर्वी जिल्हा बँकेतच बहुतांश शेतकऱ्यांची खाती होती. आता शेतकऱ्यांची अनेक बँकांत खाती असतानाही दिवाळीपूर्वी आलेली भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या हातात ठेवत जिल्हा प्रशासनाने सरकारची घोषणा खरी करून दाखवली. शुक्रवारपर्यंत आलेल्यापैकी ९८.५० टक्के निधीचे वाटप झाल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन लाख शेतकऱ्यांची दिवाळी गोड 
तहसील कार्यालयाने युद्ध पातळीवर नियोजन करून शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ९४१ शेतकऱ्यांच्या खात्यात १२३ कोटी २९ लाख २६ हजार रुपये जमा करीत त्यांची दिवाळी गोड केली. यात लातूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट व चाकूर तालुक्यांनी शंभर टक्के, औसा रेणापूर, निलंगा, देवणी व उदगीर तालुक्यांनी ९९ टक्क्याच्या पुढे तर अहमदपूर तालुका थोडा मागे राहिला असून, या तालुक्यात ९१ टक्के निधीचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात आणखी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यांच्यासाठी आणखी १२५ कोटीहून अधिक निधी लागणार आहे. हा निधी दिवाळीनंतर येताच राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तो जमा होणार असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur district 98 percentage farmers accounts get heavyrain fund