esakal | लातुरला रेल्वे तर सोडाच येत्या काळात टॅंकरनेही पाणी आणण्याची गरज भासणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

लातूर बेब.jpg

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल मिशनच्या वतीने `कॅच दी रेन` अभियानांतर्गत शनिवारी (ता. 19) घेण्यात आलेल्या जलपुनर्भरणच्या विषयावरील वेबीनारमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते

लातुरला रेल्वे तर सोडाच येत्या काळात टॅंकरनेही पाणी आणण्याची गरज भासणार नाही

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : वर्षानुवर्षे दुष्काळ व पाणीटंचाईच्या सामना करणारे लातूरकर समस्यांबाबत जागृत होते. आता दुष्काळ व पाणीटंचाई निवारणांच्या उपाययोजनांबाबतही ते जागृत झाले आहेत. विविध उपक्रमांतून प्रशासनाने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळेच सर्वजण उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. लातूरकरांत अनेक वर्षानंतर झालेली जागृती जिल्ह्याला पाणीटंचाईमुक्त करेल. रेल्वे तर सोडाच येत्या काळात टॅंकरनेही पाणी आणण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल मिशनच्या वतीने `कॅच दी रेन` अभियानांतर्गत शनिवारी (ता. 19) घेण्यात आलेल्या जलपुनर्भरणच्या विषयावरील वेबीनारमध्ये ते बोलत होते. जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यु. पी. सिंग, मिशन संचालक जी. अशोककुमार, डॉ. दिव्या अय्यर यांच्यासह श्रीकांत, सुशिलकुमार पटेल व रामवीर तन्वर हे जिल्हाधिकारी वेबीनारमध्ये सहभागी झाले होते. वेबीनारमध्ये जलसंधारण तसेच पाण्याविषयी केलेल्या प्रयोगाचीं माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. श्रीकांत यांनी साडेतीन वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जलयुक्त शिवार योजनेतून पाणलोट सशक्तीकरण, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून प्रकल्पांच्या पाणीसाठ्यांचे पुनरूज्जीवन, गाळामुळे पिकांच्या उत्पादनातील वाढ, जलयुक्त लातूर चळवळीतून मांजरा नदीचे खोलीकरण तसेच नदीपात्र गाळमुक्त, लहानमोठ्या नदी नाल्यांचे खोलीकरण, नदी परिक्रमा, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला लागणारा मुरूम उपलब्ध करून देण्यासाठी तलाव व प्रकल्पांच्या पाणीसाठ्यांचे पुनरूज्जीवन, सरकारी इमारतीच्या छतावर पडलेल्या पावसाचे फेरभरण, मालमत्ता करात सूट देऊन नागरिकांना फेरभरणासाठी प्रोत्साहन, मियावॉकी वृक्षलागवड, गणेशोत्सवातील 48 हजार मुर्तीदान, विसर्जन विहिरींचे पुनरूज्जीवन करून एक लाख लोकसंख्येला उपलब्ध केलेले पाणी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करून पाण्याचा फेरवापर, या पाण्यांतून साकारलेले क्रिकेटचे मैदान, लातूर जल परिषद, स्वयंसेवी संस्थांचे योगदान, 2018 मधील जल मिशन पुरस्कार आदी उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी वेबीनारमध्ये दिली. या उपक्रमांचे जलशक्ती मंत्रालयाचे सचिव सिंग यांनी कौतुक केले. सर्वांनीच असे योगदान दिल्यास पिण्याच्या पाण्याबाबतीत गावे व शहरे स्वयंपू्र्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लातूरकरांत आत्मविश्वास जागवला
विविध उपाययोजनांतून कोणाचीही मदत न घेता स्वतःच पाणीटंचाईचे निवारण करून शकतो, हा आत्मविश्वास नागरिकांत जागवण्यात यश आले. समस्यांसोबत उपायांबाबत जनजागृती केली. त्याचा पहिला परिणाम यंदा लातूर शहरात सार्वजनिक विहिरीत गणेशमुर्तींचे विसर्जन झाले नसल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. शहरासाठी वॉटर पॉलिशीही तयार केली असून लवकरच सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. सरकारने पाणी वितरण व्यवस्थापन तसेच वापरासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सक्तीचा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याला श्री. सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लोकांना पाण्याची किंमत कळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

(संपादन-प्रताप अवचार)