...तर कोरोना पावसाळ्यातील आजारापेक्षा कमी त्रासदायक !

latur.jpg
latur.jpg

लातूर : अंगदुखी, थंडीताप, थकवा आदी लक्षणे बदललेल्या वातावरणामुळे किंवा अन्य कारणांमुळे झाली असे समजू नका. थोडीही शंका आली तर कोरोनाची तपासणी करा. लक्षणे दिसून आल्यानंतर तातडीने तपासणी केली आणि काळजी घेतली तर कोरोना हा पावसाळ्यातील तापीच्या आजारापेक्षाही कमी त्रासदायक आहे. तपासणीकडे दुर्लक्ष केले तर तो जीवघेणा ठरू शकतो. खबरदारी घेतल्यास गर्भवती महिलांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा अनुभव जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या पत्नी सोनम यांनी सांगितला.

पाच महिन्याची गर्भवती असताना मागील महिन्यात त्यांना कोरोनाचा बाधा झाली होती. मात्र, थोडेही विचलित न होता त्यांनी कोरोनावर मात केली. जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात रविवारी (ता. नऊ) त्यांनी आपबिती सांगून महिला तसेच गर्भवती महिलांना अनुभवाचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, ``कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून तो आपल्यापर्यंत पोहचणार नाही, असे मनोमन वाटत होते. सर्वत्र कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर भीती वाटू लागली. त्यात श्रीकांत हे दररोज कोवीड केअर सेंटर व हॉस्पीटलला भेट देऊन घरी यायचे. मग तर जास्तच भीती वाढली. मी गर्भवती असल्याने काळजीत भर पडली. मी त्यांना भेटी देणे टाळता येत नाही का, असे विचारले. मात्र, त्यांनी कोरोनाची माहिती देऊन तो झाला तर काय करायचे, यासाठी मनाची तयारी करण्याचा सल्ला दिला. वादिवसानिमित्त त्यांनी `मला कोरोना झाला तर` या काल्पनिक लेखाने मनाच्या तयारीसाठी बळ मिळाले. तशी थोडी तयारीही करून ठेवली. तरीही कोरोना होणारच नाही, ही भावना कायम होती. मात्र, नकळत तो माझ्यापर्यंत आला.`

थकवा जाणवला अन् अहवाल पॉझिटिव्ह
१८ जुलै रोजी थकवा जाणवला. गर्भवती असल्याने असे होत असेल समजून दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी थंडी ताप आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळी घेतली. मात्र, गोळीची प्रभाव असेपर्यंत ताप कमी होऊ लागला. वातावरण बदलामुळे होऊ शकते, असे वाटले. दुसऱ्या दिवशी श्रीकांत यांनी रॅपीड अँटीजन टेस्ट करण्याचे ठरवले. मग मात्र, काळजी वाढली. रात्री घशात दुखू लागले. त्यानंतर मोबाईलवरून कोरोनाची लक्षणे पाहिली. त्यातील दोन लक्षणे दिसून आल्यानंतर घाबरून गेले. रात्रभर झोप आली नाही. कोरोना झाला असावा आणि नसावा, असे वाटत होते. झाला तर काय होईल, या विचाराने काहूर माजले. मुलगी शाश्वतीची व पोटातील बाळाचीही चिंता वाटू लागली. भ्यायचे बिल्कुल कारण नाही, असे सांगत श्रीकांत यांनी धीर दिला. दहा दिवसाचा प्रश्न आहे. कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे त्यांनी समजावून सांगितल्यानंतर भीती दूर झाली. डॉक्टरांनी खूप सावरले. 

पहिल्या दिवशीच ताण, नंतरचे दिवस आनंदाचे
शेवटी तपासणीत मला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. कर्मचारी व संपर्कातील लोकांच्याही तपासण्या झाल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांच्याशी चर्चा उपचार व विलगीकरणाचे स्वरूप जाणून घेतले. बऱ्याच संकल्पना स्पष्ट झाल्याने घरीच विलगीकरणात रहाण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र खोलीत पाऊल ठेवल्यापासून मनात थोडेही नकारात्मक विचार येणार नाहीत, यासाठी काय करायचे आणि काय करायचे नाही, याबाबत पक्का निर्धार केला. मोबाईलवरून संपर्क कमी केला. डॉक्टर व महत्वाचे कॉल घेतले. जुन्या मैत्रिणींशी संवाद केला. शाश्वतीची जबाबदारी श्रीकांत यांनी घेतल्याने मनावरील दडपण दूर झाले. रोजचा दिनक्रम तयार केला. भगवत गीता वाचण्यासोबत विनोदी मालिका व चित्रपट पाहिले. बाळावर काहीच परिणाम होत नाही तसेच साईड इफेक्टही होत नसल्याचा विश्वास डॉक्टरांनी दिला. यामुळे खूप हलके वाटले. केवळ पहिल्या दिवशीच ताण वाटला. त्यानंतर बरे होईपर्यंतचा प्रत्येक दिवस आनंदात गेला.

नियमित प्राणायाम व पूर्ण आहार
थोडीशी अंगदुखी गरम पाणी पिल्याने दूर झाली. तोंडाला चव नव्हती तर वजन कमी होऊ नये म्हणून भरपेट आहार घेतला. मास्कचा वापर करून दूर अंतर ठेऊन श्रीकांत व शाश्वतीशी संवाद साधला. नियमित प्राणायाम केला. खबरदारी घेतली. संपर्क बंद केले. ऑक्सीजन पातळी व बीपी स्वतः चेक केली. सर्दी होणार नाही तसेच घशाला त्रास होईल, असे काही खाल्ले नाही. महिलांनी आतापासूनच मुलांना वडीलांची सवय लावून ठेवावी. म्हणजे उपचाराच्या काळात दडपण येणार नाही. आधीपासून सांगितले तर मुले समजून घेतात. लक्षणे जाणवताच स्वतःचे विलगीकरण करा. सरकारी व्यवस्थेतून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या पाहूनच त्याच व्यवस्थेतून उपचार घेण्यासाठी आत्मविश्वास वाढला व विश्वास ठेऊन उपचार घेतला.

मुलीला सांभाळणे कठीण
मुलीला सांभाळणे हे जिल्हा सांभाळण्यापेक्षा कठीण काम असल्याचा अनुभव मी घेतला. कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसेच अंमलबजावणीच्या अनुभवाचा फायदा झाला. त्यातूनच पत्नीला हमखास बरे होण्याचा विश्वास देता आला. तिच्या मनात थोडेही नकारात्मक विचार येणार नाहीत, याची पावलापावलावर काळजी घेतली. एका काळजीवाहकाची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली. जिल्हाधिकारी म्हणून कोरोनाबाधितांपासून आपण फिजिकली वेगळे राहू शकतो मात्र, सोशली दूर राहू शकत नाही, ही माझी भूमिका पत्नीला पटवून दिल्याने रोजच्या कामाकडे दुर्लक्ष झाले नाही, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी या वेळी सांगितले.

Edit- Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com