लातूरचा दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी पुसणार!

हरी तुगावकर
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

भारतीय जैन संघटनेचे मोठे सहकार्य लाभत आहे. त्यांच्या सहकार्यातून जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळमु्क्त करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

लातूर - लातूर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. रेल्वेने पाणी येणे ही बाब भूषणावह नव्हती. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची मोठी कामे झाली. यातून जिल्हा
दुष्काळमुक्त झाला आहे. पण लातूरचा दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी
पुसण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात भारतीय जैन संघटनेचे मोठे सहकार्य
लाभत आहे. त्यांच्या सहकार्यातून जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त
करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. 23) येथे आयोजित जलयुक्त अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार विक्रम काळे, अॅड. त्र्यंबक
भिसे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन ईटनकर उपस्थित होते.

अडचणीच्या काळात आम्ही सर्वत्र एकत्र येतो हे लातूरने दाखवून दिले आहे.
जलयुक्तच्या कामामुळे जिल्हा दुष्काळमुक्त झाला आहे. पण पाण्याचा वापर कसा करायचा हे सांगण्याची गरज आहे. आजही पिक पद्धती बदलली नाही. दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी पुसण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. यात भारतीय जैन संघटनेचे मोठे सहकार्य मिळत आहे. ते सर्व मशीनचा पुरवठा करणार आहेत. भूकंप झाल्याने जिल्ह्यासाठी ता. 30 सप्टेंबर हा काळा दिवस आहे. याच दिवशी जलयुक्त अभियानाची सुरवात करण्यात येणार आहे. यासाठी माजी केंद्रीयमंत्री शरद पवार, शिवराज पाटील चाकूरकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हे काम करीत असताना गावा गावातील नदी, नाले, ओढ्याची ब्ल्यु प्रिंट तयार करावी. शासनानेच सर्व काही करावे अशा गावात काम करू नये. गावांनी एक पाऊल पुढे यावे शासन दोन पावले पुढे येवून काम करेल.या कामात गणेश मंडळाचा सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री. मुथा यांनी बुलढाणा जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती दिली.
तसेच लातूर जिल्ह्याला दुष्काळाचा लागलेला कलंक पुसण्यासाठी भारतीय जैन संघटना काम करणार आहे. सर्व मशिन मोफत देण्यात येणार आहेत. मशिन कमी पडू दिल्या जाणार नाहीत. सर्व गावांचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. लोकांनी, गावांनी पुढे यावे. सर्वांच्या एकजुटीतून हे काम केले जाईल, अशी माहिती श्री. मुथा यांनी दिली.
 

Web Title: Latur district will be permanently drought free