वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे यांचा मृत्यू

हरी तुगावकर
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

लातूर येथील खाडगाव रोड भागातील वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे (वय 65) यांच्या दुचाकीला चार चाकी वाहने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.  पण हा अपघात नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय त्यांचा मुलगा नामदेव साठे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

लातूर ः येथील खाडगाव रोड भागातील वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे (वय 65) यांच्या दुचाकीला चार चाकी वाहने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 6) सायंकाळी खाडगाव शिवारात घडली आहे. पण हा अपघात नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय त्यांचा मुलगा नामदेव साठे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

येथील खाडगाव रस्त्यावरील वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे हे बुधवारी सायंकाळी शेतातून घराकडे दुचाकीवर येत होते. त्याच वेळी खाडगाव शिवारात पाठीमागून आलेल्या एका चार चाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. ते गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाले. ही घटना कळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. 

दुचाकीला धडक बसल्याने ही चारचाकी रस्त्याच्या खाली गेल्याने अडकून बसली. लोकांनी या चारचाकी वाहनाकडे धाव घेतली. पण आतमधील व्यक्तीने या लोकांपैकी एका व्यक्तीला मारहाण केली. दरम्यान पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेत जनार्दन साठे यांचा मात्र मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेवून ही चार चाकी जप्त करीत त्या व्यक्तीलाही ताब्यात घेतले. जनार्दन साठे हे अध्यात्मीक वृत्तीचे होते. 

जानेवारी महिन्यात जमिनीच्या वादातून त्यांचा मुलगा आकाश साठे याचा या घटनास्थळाच्या परिसरातच खून झाला होता. या प्रकरणातील आरोपी अद्यापही तुरूंगात आहेत. या घटनेत जनार्दन साठे हे फिर्यादी होते. या घटनेच्या पार्श्वभूमिवर जनार्दन साठे यांचा आज अपघातात मृत्यू झाला. हा अपघात नसून त्यांचाही खूनच करण्यात आल्याचा संशय त्यांचा मुलगा नामदेव साठे यांनी व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur Janardhan Sathe dies