प्रियकराशी लग्न करण्यासाठी चुलत्याचा खून

हरी तुगावकर
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

लातूर येथील खाडगाव रोड भागातील वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे (वय 65) यांच्या खून प्रकरणाचा तपास आता लागला आहे. चुलत्याच्या खुनाची पुतणीनेच सुपारी दिल्याचे आता समोर आहे. या पुतणीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

लातूर ः येथील खाडगाव रोड भागातील वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे (वय 65) यांच्या खून प्रकरणाचा तपास आता लागला आहे. चुलत्याच्या खुनाची पुतणीनेच सुपारी दिल्याचे आता समोर आहे. या पुतणीसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना ता. 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी दिली. 

येथील खाडगाव रस्त्यावरील वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे हे बुधवारी सायंकाळी शेतातून घराकडे दुचाकीवर येत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. ही धडक इतकी जोराची होती की त्यातच साठे यांचा मृत्यू झाला. हा अपघात दाखविण्याचा आरोपींचा प्रयत्न होता; पण तो नियोजनपूर्वक खून असल्याचे आता समोर आले आहे.

त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता. घटना घडल्यानंतर पोलिसांनी चारचाकी वाहन; तसेच त्यातील एका व्यक्तीला ताब्यातही घेतले होते. 
जानेवारी महिन्यात जमिनीच्या वादातून साठे यांचा मुलगा आकाश साठे याचा खून झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी विलास साठे, गोपाळ साठे, अश्विन साठे, सचिन साठे, सोमनाथ साठे, दीपक साठे, अमोल साठे हे सर्व सातजण सध्या तुरुंगात आहेत. या घटनेत जनार्दन साठे हे फिर्यादी होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जनार्दन साठे यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. 

या प्रकरणात साठे यांचा मुलगा नामदेव साठे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात वरील सात जण; तसेच पूजा साठे, आशिष जाधव, गौरव लोहार, माजी नगरसेवक विष्णू साठे, धनराज साठे, प्रेम मोरे, करणसिंह गहिरवार, गोविंद गहिरवार अशा एकूण 14 जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता पुतणीनेच चुलत्याच्या खुनाची सुपारी दिल्याचे समोर आले आहे, अशी माहिती उपअधीक्षक श्री. सांगळे यांनी दिली. 

या प्रकरणातील संशयित पूजा विलास साठे ही आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वारंवार तुरुंगात जात होती. तेथे उदगीरमधील एका तरुणाशी तिची ओळख झाली. हा तरुण सध्या पुण्यात राहत आहे. या तरुणाचे वडीलही तुरुंगातच आहेत. वारंवार भेट होत गेल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला; पण वडील तुरुंगातून बाहेर आल्याशिवाय लग्न करता येणार नाही, हे तिच्या लक्षात आले; पण जनार्दन साठे हे आपल्या वडिलांचा जामीन होऊ देत नाहीत. न्यायालयात ते सातत्याने अर्ज करीत असल्याने वडील बाहेर येऊ शकत नाहीत. त्यामुळे या तरुणाच्या सहकार्याने जनार्दन साठे यांना संपविण्याचे तिने ठरविले. यातून तिने हा सर्व प्रकार घडवून आणला असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

पूजा साठेसह गौरव लोहार, गोविंद गहिरवार या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता ता. 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार आहेत. काही आरोपी ताब्यात असून काहींचा शोध सुरू आहे, अशी माहिती श्री. सांगळे यांनी दिली. 

या प्रकरणाचा तपास करताना सायबर सेलचे राजेश कंचे, रियाज सौदागर; तसेच पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक माळी, उपनिरीक्षक किरण पठारे, गणेश कदम, कल्याण नेरकर यांचे काम महत्त्वाचे ठरले आहे. या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur murder mystery solved