मुरूडमध्ये बँकसमोरूनच दुचाकीच्या डिक्कीतून चोरले चार लाख रूपये

विकास गाढवे
Thursday, 7 January 2021

भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून पैसे काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली चार लाख 30 हजार रूपयाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे

मुरूड (ता. लातूर): येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून पैसे काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली चार लाख 30 हजार रूपयाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे. गावात दुपारी 1 वाजता घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

येथील संजय प्रकाश नाडे यांच्या एसपीएन अॅग्रो लिमिटेडमधील (शेतकरी गुळ उद्योग) अकाऊटंट प्रशांत वामनराव खोसे (वय 42) यांनी बुधवारी आठवडी बाजारानिमित्त कामगारांची मजुरी देण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून चार लाख तीस हजार रूपये काढले. रुमालात गुंडाळून त्यांनी ही रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली व दुचाकी चालू करुन ते निघाले. याच दरम्यान चोरट्यांनी ही रक्कम लांबवली.

कार अपघातात एक ठार; जळकोट तालुक्यातील घटना

उद्योगाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी रक्कम काढण्यासाठी डिक्की उघडली तर ती आधीच उघडलेली त्यांना दिसली. डिक्की उघडून पाहिल्यानंतर त्यात रक्कम नसल्याचे दिसून आले. आठवडी बाजारामुळे गावात मोठी गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी प्रशांत खोसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या काही दिवसापासून येथे चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. मध्यंत्तरी दिवसा घरफोडीनंतर आडत दुकानेही चोरट्यांनी फोडले होते. चोरटे सक्रिय झाल्यामुळे लातूर येथे होणारे चोरीचे प्रकार गावात घडू लागले. यामुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

एटीएम बंद, सीसीटीव्ही नाही-
भारतीय स्टेट बँकेच्या येथील शाखेतील एटीएम सेवा सतत बंद असते. बँकेने समोरच्या बाजूने एकही सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला नसल्याचे सहायक पोलिस निरिक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. सीसीटीव्ही असता तर ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असती. बँकेने किमान एटीएमच्या सुरक्षेसाठी तरी समोरच्या बाजूने कॅमेरे बसवण्याची गरज पुढे येत आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur Murud crime news Four lakh rupees stolen from trunk bike front bank