लग्नाच्या जेवणातून १०५ वऱ्हाडींना विषबाधा, लातूरच्या वाढवण्यातील धक्कादायक घटना 

सचिन शिवशेट्टे
Monday, 25 January 2021

विवाह सोहळ्यात अनेकांनी जेवणावर ताव मारला. जेवणानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला.

उदगीर (जि.लातूर) : वाढवणा बुद्रूक (ता.उदगीर) येथे रविवारी (ता.२४) दुपारी लग्नसमारंभात १०५ हून अधिक वऱ्हाडी मडळींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली. यात २९  लहान मुलांचा समावेश आहे. लग्नातील जेवणातून ही विषबाधा झाल्यामुळे प्राथमिक आरोग्य केद्रात रुग्णालयात उपचार सुरु आसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी दिली.

तलावात पोहणे पडले महागात, चाकूरजवळ दोन मेंढपाळांचा पाण्यात बुडून मृत्यू

येथील इसाक हवालदार यांच्या मुलीचा विवाह  रविवारी दुपारच्या सुमारास पार पडला. या विवाह सोहळ्यात अनेकांनी जेवणावर ताव मारला. जेवणानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला. विषबाधा झालेल्या सर्व वऱ्हाड्यांवर वाढवणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. गोड पदार्थ म्हणून चकली ठेवण्यात आली होती. चकली खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!

सुदैवाने अद्याप कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. या विवाह सभारंभात परिसरातील अंदाजे २००० वऱ्हाडी सहभागी झाल्याचा अंदाज आहे. १०५ जणांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याची यांची चौकाशी करण्यासाठी गोड पदार्थ प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. लहान मुलांसह मोठ्या प्रमाणात विषबाधा झालेले रुग्ण असल्यामुळे परिसरातील रुग्णवाहिका दाखल झाल्या असुन खासगी रुग्णालयातही उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur News 105 People Suffered Food Poisoning In Udgir Block