esakal | शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा, लातूर जिल्हा बॅंकेच्या चालू थकबाकीदारांना मिळेनात ५० हजार रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Farmers News

कर्ज घेऊन प्रामाणिक परतफेड करतात अशा चालू बाकीदार शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले होते.

शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा, लातूर जिल्हा बॅंकेच्या चालू थकबाकीदारांना मिळेनात ५० हजार रुपये

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चालू बाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले. त्याला वर्ष झाले. पण, अजूनही हे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील २८ हजार शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने दीड लाखापर्यंतची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजना जाहीर केली होती.

कर्ज घेऊन प्रामाणिक परतफेड करतात अशा चालू बाकीदार शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले होते. त्यानंतर सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन लाखापर्यंत करून चालू बाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंतचे अनुदान जाहीर केले होते. मात्र, हे अनुदान अद्याप मिळाले नाही. त्यामुळे अनुदान मिळणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


कोरोनाचा परिणाम?
निलंगा तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३१ हजार कर्जदार सभासद आहेत. त्यापैकी २८ हजार शेतकरी चालू बाकीदार आहेत. तीन हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. गतवर्षीपासून कोरोना संसर्ग सुरू झाल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर याचा परिणाम झाला आहे. अतिरिक्त भार तिजोरीवर पडल्याने शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान देणे रखडले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणताही ठोस निर्णय जाहीर झाला नसल्यामुळे अनुदान मिळण्याची आशा मावळल्याचे काही शेतकरी बोलत आहे.


राज्य सरकारने चालू बाकीदार शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले प्रोत्साहनपर अनुदान अद्याप दिलेले नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. जाहीर केलेल्या कर्जमाफीचे पैसेही विलंबाने मिळत आहेत. पीकविमा, अतिवृष्टी अनुदानही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. या सरकारच्या घोषणा सध्या तरी फसव्या दिसत आहेत. यामुळे जनतेचा विश्वास उडाला आहे.
- गोविंदराव पाटील, प्रगतिशील शेतकरी
 

संपादन - गणेश पिटेकर

loading image