लातूरमध्ये जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद, कोरोनाची साखळी तोडण्‍यासाठी शहरात कडकडीत बंद

Janta Curfew In Latur
Janta Curfew In Latur

लातूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला पहिल्याच दिवशी, आज लातूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. काही अपवाद वगळता जिल्ह्याच्या बहुतांश भागात संचारबंदीचा प्रत्यय आला.


शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांनी शनिवार, रविवारी स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले होते. अर्थात, त्याची सक्ती नसल्याने पहिल्या दिवशी त्याला कसा प्रतिसाद मिळेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, लातूरकरांनी कमालीची सजगता दाखवत आज जिल्हाधिकाऱ्यांचा आवाहनाला उदंड प्रतिसाद दिला. कामानिमित्त रस्त्यांवर धावणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांचा अपवाद सोडला तर शहरात जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला. व्यापारी, व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. ग्राहक व व्यावसायिकांनी नेहमीच गजबजलेला गंजगोलाई परिसर व शहरातील चौक दिवसभर सुनेसुने होते. गल्लीबोळातील दुकानेही बंद होती.


याच काळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मास्क न घालणाऱ्या नागरिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. सिटी बसमधील प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. एसटी महामंडळाची बससेवा सुरू असली तरी प्रवाशांची गर्दी नव्हती. नेहमी गर्दी असलेल्या बसस्थानकात बोटावर मोजण्याएवढे प्रवासी दिसून आले. नागरिकांनी दाखवलेल्या या सजगतेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी कौतुक केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लातूरकरांकडून यापुढेही असाच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून आभार
जनता कर्फ्यूला पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल पृथ्वीराज यांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. ग्रामीण भागाच्या तुलनेत जिल्ह्याच्या शहरी भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारीही अशाच पद्धतीने नागरिक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. येत्या सोमवार, मंगळवारी आणखी काही उपाययोजनांबाबत लोकांचे मत अजमावून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत लोक सोबत असल्याचे पाहून खूप बळ येते. उपाययोजनांचे महत्त्व बिंबल्याचे, आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन-जनता एकत्र आल्याचा प्रत्यय या उपक्रमातून आला.
- पृथ्वीराज बी. पी., जिल्हाधिकारी, लातूर

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com