विद्यार्थ्यांनो 'नीट' परीक्षेला जाताय, मग ही बातमी नक्की वाचा ! लातूरात अशी असेल व्यवस्था.

हरी तुगावकर
Friday, 11 September 2020

कोरोना नसलेल्या पण ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची सोय

लातूर : बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली `नीट`ची परीक्षा रविवारी (ता.१३) होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ही परीक्षा होत आहे. त्यामुळे सर्व खबरदारीच्या उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोना बाधित विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. कोरोना नसलेल्या पण ताप, सर्दी, खोकल्याचे लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र `आयसोलेशन` रुम प्रत्येक केंद्रावर असणार आहे. त्या ठिकाणी बसून असे विद्यार्थी परीक्षा देतील. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना कोणतीही काळजी न करता या परीक्षेला सामोरे जाता येणार आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

परीक्षा केंद्रावर होणार तपासणी

लातूर जिल्ह्यात या परीक्षेसाठी ४३ परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रावर १६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या सर्व परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. केंद्रात प्रवेश केल्यानंतर मुलांचा हात कोठे कोठे लागला जावू शकतो हे लक्षात घेवून निर्जंतुकीकरण केले गेले आहे. तसेच केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्याच्या तापाची (टेम्परेचर) तपासणी केली जाणार आहे.

मास्क सक्तीचा, हॅण्डग्लोजला मुभा

कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने विद्यार्थ्यांसाठी मास्क सक्तीचा असणार आहे. मास्क घालूनच परीक्षा द्यावी लागणार आहे. हॅण्डग्लोजला मात्र मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर हॅण्डग्लोज वापरायचा का नाही हे सोडण्यात आले आहे. पण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सोबत सॅनिटायझरची बॉटल सक्तीची करण्यात आली आहे. याचा वापर करून वारंवार हात धुता येणार आहेत.

केंद्रात प्रवेशासाठी `टायमिंग स्लॉट`

परीक्षा केंद्रावर एकाच वेळी गर्दी होवू नये या करीता विद्यार्थ्यांना टायमिंग स्लॉट देण्यात आले आहेत. रविवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत परीक्षा होत आहे. सकाळी ११ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. दिलेल्या टायमिंग स्लॉटनंतर एखादा विद्यार्थी आला तरीही त्याला आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी दीड नंतर मात्र प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावर विद्यार्थी जास्त वेळ थांबणार असल्याने बिस्कीट आणि पाण्याची व्यवस्था असणार आहे.

विद्यार्थ्यांनी सोबत काय आणावे

  • आधार कार्ड, बारावी परीक्षेचे हॉल तिकीट, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स (या पैकी एक ओरिजनल ओळखपत्र)
  • सेल्फ डिक्लेरेशनमधील संपूर्ण माहिती भरलेले तीन पानांचे कलर किंवा ब्लॅक अॅण्ड व्हाईट एडमिट कार्ड
  • ॲडमिट कार्डवर न विसरता पालकांची सही घ्यावी
  • ॲडमिट कार्डवर स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा मारावा
  • पारदर्शक ट्रान्सपरंट पिण्याच्या पाण्याची बॉटल (अर्धा लिटरची आणली तर हॅण्डलिंगला सोपी जाईल)
  • नीट फॉर्म भरत असताना वापरलेला पण ऍडमिट कार्ड वर चिटकलेला सोडून आणखीन पासपोर्ट साईज (१.५×२ इंच) फोटो
  • स्वतःची सॅनिटायझरची लहान बॉटल
  • कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दोन मास्क व हॅण्डग्लोज. 

 

लातूर जिल्ह्यात नीटच्या परीक्षेची तयारी झाली आहे. विद्यार्थ्यांनी कोरोनाची काळजी न करता ही परीक्षा द्यावी. मास्कचा वापर करावा. हॅण्डग्लोजचा वापर विद्यार्थ्यांच्या मनावर आहे. पण सॅनिटायझरचे बॉटल अनिवार्य आहे. ड्रेसकोडची सक्ती नाही. कोरोना बाधित विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. कोरोना नसलेले पण केवळ ताप, सर्दी, खोकला असलेल्या विद्यार्थ्यांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
भारतभूषण झा, समन्वयक, नीट परीक्षा, लातूर जिल्हा.

कोरोनामुळे परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्य़ात आले आहे. दोन विद्यार्थ्यात पाच ते सहा फुटाचे अंतर असेल अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. एखाद्याचे ॲडमिट कार्ड किंवा छायाचित्र नसेल तर ते त्याला तातडीने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण हे सर्व नोंदणी करण्यापूर्वी होणे अपेक्षीत आहे.
डी. के. देशमुख, केंद्र प्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालय.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्वाची आहे. कोरोनामुळे सर्व केंद्रावर खबरदारी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जावे.
सचिन बांगड, मार्गदर्शक, नीट परीक्षा.

संपादन- प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur News Isolation room for NEET examination