बंगळुरू रेल्वेतून लातूरकरांची बोळवण

हरी तुगावकर
गुरुवार, 18 जानेवारी 2018

लातूर - बिदर-यशवंतपूर (बंगळुरू) ही रेल्वेगाडी लातूरपर्यंत आणण्यावरून सध्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू आहे; पण काही महिन्यांपूर्वी बिदरपर्यंत गेलेली लातूर-मुंबई ही लातूर एक्‍स्प्रेस कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात येईल, असे सत्ताधारी छातीठोकपणे सांगत होते. दरम्यान, आता बंगळुरू रेल्वे आणल्याचा आनंदोत्सव साजरा करणारे सत्ताधारी मात्र लातूर एक्‍स्प्रेसवर चुप्पी साधून आहेत.

लातूर - बिदर-यशवंतपूर (बंगळुरू) ही रेल्वेगाडी लातूरपर्यंत आणण्यावरून सध्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू आहे; पण काही महिन्यांपूर्वी बिदरपर्यंत गेलेली लातूर-मुंबई ही लातूर एक्‍स्प्रेस कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात येईल, असे सत्ताधारी छातीठोकपणे सांगत होते. दरम्यान, आता बंगळुरू रेल्वे आणल्याचा आनंदोत्सव साजरा करणारे सत्ताधारी मात्र लातूर एक्‍स्प्रेसवर चुप्पी साधून आहेत.

कर्नाटकातील निवडणुका चालू वर्षाअखेरीज आहेत. त्यामुळे एकदा बंगळुरू रेल्वे सुरू झाली की लातूर एक्‍स्प्रेस बिदरपर्यंत सातही दिवस धावण्याची शक्‍यता निर्माण झाली. याचा मोठा परिणाम लातूरच्या प्रवाशांवर होणार आहे.

महालक्ष्मी एक्‍सप्रेस, अमरावती एक्‍स्प्रेस, सिद्धेश्वर एक्‍स्प्रेस, विदर्भ एक्‍स्प्रेस अशा मुंबईहून जिल्ह्याच्या ठिकाणी एक्‍स्प्रेस रेल्वेगाड्या धावतात. याच धर्तीवर लातूर-मुंबई ही लातूर एक्‍स्प्रेस सुरू झाली होती. दहाही वर्षे ही रेल्वे फायद्यात आहे. वरील सर्व गाड्या त्या-त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून थांबत आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणच्या नागरिकांना राजधानीला जाता यावे, याकरिता ही सोय आहे; पण लातूर एक्‍स्प्रेस ही एकमेव गाडी सीमापार करीत कर्नाटकातील बिदर या जिल्ह्याच्या ठिकाणी लातूरकरांवर अन्याय करीत नेण्यात आली आहे. 

बिदरचे खासदार फायद्यात
बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांची खेळी अखेर यशस्वी झाली आहे. लातूरचे लोकप्रतिनिधी केवळ पाहतच राहिले आहेत. यशवंतपूर रेल्वे लातूरपर्यंत देऊन त्यांनी अखेर लातूरकरांची बोळवण केली. त्यामुळे लातूर एक्‍स्प्रेसचा प्रश्न मागे पडला आहे. लातूर एक्‍स्प्रेस सध्या बिदरपर्यंत आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. त्यात कर्नाटकात चालू वर्षाखेरीस विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यात श्री. खुब्बा हे रेल्वे समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे एकदाची यशवंतपूर रेल्वे सुरू झाली, की लातूर एक्‍स्प्रेस बिदरपर्यंत आठवड्यातील  सातही दिवस नेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्या दृष्टीने हालचालीही सुरू झाल्या आहेत. 

कृती समिती झाली गायब
गेल्यावर्षी लातूर एक्‍स्प्रेस बिदरपर्यंत गेली. त्यावेळी लातूर एक्‍स्प्रेस बचाव कृती समिती स्थापन झाली. वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. सत्ताधाऱ्यांकडून आश्वासने दिल्यानंतर हे आंदोलन थंड झाले. आता बंगळुरू रेल्वे सुरू होत आहे, पण लातूर एक्‍स्प्रेस काही थांबली नाही. ही समितीच गायब झाल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच्या खेळात लातूरच्या प्रवाशांची मात्र मोठी अडचण होणार आहे.

मुंबईवर चुप्पी कशासाठी?
लातूरहून बंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या नगण्य आहे. त्यात लातूर रोडवरून बंगळुरूला जाण्यासाठी रोज रेल्वे आहे. त्यात फेब्रुवारीपासून बिदर यशवंतपूर ही रेल्वे लातूरपर्यंत येणार आहे. ही रेल्वे आणण्यावरून भारतीय जनता पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. आनंदोत्सवही साजरा केला जात आहे; पण लातूरकरांच्या हक्काची असलेल्या लातूर एक्‍स्प्रेसवर मात्र खासदार व पालकमंत्री गटाकडून चुप्पी साधली जात आहे. लातूर एक्‍स्प्रेस कोठेही जाणार नाही, असे सांगणारे खासदार सुनील गायकवाड व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर मात्र आता काय करणार याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: latur news railway