वाहतूक नियंत्रणाचा भार ५२ जणांवर

हरी तुगावकर 
सोमवार, 10 जुलै 2017

लातूर - शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यात अरुंद रस्ते, बेशिस्त वाहतूक याचा परिणाम म्हणून सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरात असलेल्या हजारो वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडे फक्त ५२ पोलिस आहेत. वाहतुकीचा भार सध्या त्यांच्याच खांद्यावर आहे. बेशिस्त वाहतुकीला लातूरकरही कारणीभूत आहेत; तसेच शहरातील वाहतुकीच्या बाबतीत महापालिकेचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

महापालिका कधी देणार लक्ष
शहरातील वाहतुकीच्या संदर्भात पोलिसांसोबतच महापालिकेची भूमिकाही महत्त्वाची आहे. यात सिग्नल उभे करणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, साईन बोर्ड, स्टॉपच्या लाईन, चांगले रस्ते अशा प्राथमिक व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे काम आहे; पण सध्या शहरात या व्यवस्थाच दिसत नाहीत. शहरात केवळ दोनच सिग्नल सुरू आहेत. नवीन सिग्नल बसविण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरूच आहे. त्याचा परिणामही वाहतुकीच्या कोंडीवर होताना दिसत आहे. 

अपुरे मनुष्यबळ 
शहर वाहतूक शाखेची स्थापना होऊन पंधरा-वीस वर्षे झाली आहेत. त्या वेळी या शाखेला ९३ पदे मंजूर करण्यात आली होती. त्यात तीन अधिकाऱ्यांचा समावेश होता; पण शाखा स्थापन झाल्यापासून एकदाही या शाखेला ९३ पोलिसांचे बळ मिळाले नाही. सध्या केवळ ५२ पोलिस या शाखेकडे आहेत. पंधरा-वीस वर्षांत वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या सर्वांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केवळ ५२ जणांच्या खांद्यावर आहे.

महिन्यात ७ लाखांचा दंड
शहर वाहतूक शाखा बेशिस्त वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. शहरात ऑटो रिक्षा हा वाहतुकीतला प्रमुख घटक आहे. पाच हजारपेक्षा जास्त ऑटो रिक्षा आहेत. त्यांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाईही केली जात आहे. गेल्या महिनाभरात या शाखेने दंडात्मक कारवाई करून सात लाखांचा दंड वसूल केला आहे. रविवारी तर एकाच दिवशी ३२ ऑटो रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. 

स्वयंशिस्तही हवी 
शहरात गंजगोलाई, गूळ मार्केट, शिवाजी चौक, शाहू महाविद्यालयाचा परिसर, भुसार लाईन अशा अनेक ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. येथे पी वन पी टूचीही अंमलबजावणी होत नाही. तर दुसरीकडे एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न वाहनधारकांकडून होताना दिसत आहे. यातूनच वाहतूक ठप्प होते. त्यामुळे वाहनधारकांनीही स्वयंशिस्त पाळली तर अनेक समस्या सुटणार आहेत.

शहरातील वाहतूक सुरळीत चालावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. दंडात्मक कारवाईही केली जात आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनीही वाहतुकीच्या प्रश्‍नाकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे इतर सुविधा लवकरच उपलब्ध होतील.
- लक्ष्मण राख, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

Web Title: latur news traffic