लातूर जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेला थाटात सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

जिल्ह्यातील दहा पंचायत समित्या; तसेच जिल्हा परिषदेचा एक अशा अकरा संघांनी जोरदार पथसंचलन केले.

लातूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामातून विरंगुळा म्हणून खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. तंदुरुस्तीसाठी; तसेच रोजच्या कामकाजातील उत्साह वाढवण्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या वतीने मंगळवारी (ता. 14) येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे होते. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट हरिसिंग, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, समाजकल्याण सभापती संजय दोवरे, कृषी सभापती बजरंग जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

चोरीला गेलेल्या गाड्या सहसा कधीच सापडत नाहीत, पण लातुरात मात्र...

जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले, की "क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांतून संघभावना तयार होते. जिल्हा परिषदेचे कर्मचारी संघभावनेतून काम करतात. यामुळेच गेल्यावर्षी भीषण दुष्काळ असतानाही त्याची तीव्रता जाणवली नाही. पूर्वी जिल्हा परिषद राज्यात क्रमांक एकवर होती. पुन्ही तिला एकवर आणण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामुदायिक प्रयत्न करावेत. श्री. केंद्रे यांनीही अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. क्रीडाज्योत पेटवून व ध्वजवंदनाने स्पर्धेला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील दहा पंचायत समित्या; तसेच जिल्हा परिषदेचा एक अशा अकरा संघांनी जोरदार पथसंचलन केले.

सोळा किलो गांजा जप्त

महापुरुषांसह रामदेवबाबा तसेच अन्य व्यक्तींच्या वेशभूषा साकारून; तसेच जिवंत देखावे सादर करीत अधिकारी व कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते. बैलगाडी व सायकलींचाही संचलनात समावेश होता. हे संचलन स्पर्धेचे आकर्षण ठरले. पहिल्या दिवशी व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, खो-खो, क्रिकेट, बुद्धिबळ आणि कॅरम आदी क्रीडा स्पर्धांत सलामी लढती झाल्या. आणखी तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. लक्ष्मण बेल्लाळे यांनी खेळाडूंना शपथ दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रभू जाधव यांनी प्रास्ताविक केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Zilha Parishad Sports Competition Starts