ऑनलाईन सभेची कहाणी : अध्यक्ष आले अन् `जीबी` रद्द झाल्याचे सांगून गेले !

  विकास गाढवे
Thursday, 10 September 2020

जिल्हा परिषदेच्या वतीने गुरूवारी (ता. दहा) दुपारी एक वाजता घेण्यात आलेली ऑनलाईन सर्वसाधारण सभा काही सेकंदात गुंडाळण्यात आली. अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी सभेत काही सेकंदासाठी आले आणि त्यांनी सभा रद्द झाल्याचे जाहिर केले. त्यामुळे बराच काळ ऑनलाईन बैठकीची चर्चा रंगली होती. 

लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने गुरूवारी (ता. दहा) दुपारी एक वाजता घेण्यात आलेली ऑनलाईन सर्वसाधारण सभा काही सेकंदात गुंडाळण्यात आली. अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी सभेत काही सेकंदासाठी आले आणि त्यांनी सभा रद्द झाल्याचे जाहिर केले. त्यास माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी जोरदार आक्षेप घेतला. तो सुरू असतानाच घेताच सभेची ऑनलाईन प्रक्रिया बंद करून टाकत अध्यक्षांनी काढतापाय घेतला. काही क्षणात घडलेल्या प्रकाराची माहिती नसलेले पदाधिकारी, सदस्य व अधिकारी तासभर सभा सुरू होण्याची ऑनलाईन प्रतीक्षा करत राहिले.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने गुरूवारी दुसऱ्यांदा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी १६ जून रोजी झालेल्या सभेत बहुसंख्य सदस्यांनी सभागृहात हजेरी लावली होती व काही सदस्य ऑनलाईन सहभागी झाले होते. कोरोनाचा प्रसार वाढल्याने गुरूवारच्या सभेसाठी सदस्यांनी ऑनलाईन सहभागी होण्याला प्राधान्य दिले. अनेक सदस्य पंचायत समिती कार्यालयातून सहभागी झाले होते. तर काहींनी घरून, घराच्या दारातून, शेतातून व वाहनात बसून सभेत सहभाग दिला होता. दुपारी एकपूर्वीच अनेकजण झूमअॅपद्वारे सभेला उपस्थित झाले होते. दहा मिनिटानंतर तिरूके यांनी अध्यक्षांना बोलावून सभा सुरू करण्याची विनंती सभेचे सचिव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांना केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर काही वेळांनी अध्यक्ष केंद्रे आले व त्यांनी लगेच सभा रद्द झाल्याचे जाहिर केले. त्याला तिरूके यांनी आक्षेप घेतला. या पद्धतीने सभा रद्द किंवा तहकूब करता येत नसल्याचे त्यांनी सांगताच जाधव यांनी अध्यक्षांना तसे अधिकार असल्याचे नियमाचा आधार घेऊन सांगितले. तिरूके या विषयावर बोलत असतानाच केंद्रे यांनी सभेची ऑनलाईन प्रक्रिया रद्द करून टाकली. काहीतरी तांत्रिक अडचण आल्याचे समजून तिरूके यांच्यासह अनेक सदस्य व अधिकारी सभेत पुन्हा सहभागी झाले. त्यांनी सभा सुरू होण्याची प्रतिक्षा केली. एका सदस्याने तर दुसऱ्या कोणाला तरी अध्यक्ष करण्याची सूचना केली. सदस्यांनी आपापसांत कुठे बसलात, चहापाणी झाले की नाही, आदी प्रश्न करून संवाद साधला. अजून काही चालू नाही बाबा, असेही काहीजण बोलत होते. अर्धातासाने एकानंतर एक सदस्य ऑनलाईन बैठकीतून बाहेर पडू लागले. सभा रद्द झाल्याची माहिती नसलेले अधिकारी व सदस्य दोन वाजेपर्यंत ऑनलाईन दिसले. यात बांधकाम सभापती संगिता घुले यांचाही समावेश होता.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काय संकट आहे, कळेना?
याबाबत श्री. तिरूके म्हणाले, ``सभा रद्द करायची झाली तरी सभेचे नियम व सभ्यता पाळली पाहिजे. राष्ट्रगीताने सभेची सुरूवात करावी लागते. त्यानंतर सदस्यांचे मते जाणून घेऊन आणि कारण देऊनच सभा तहकूब करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. गुरूवारच्या सभेत नियमांचा भंग केला आहे. सभेत येऊन लगेच ती रद्द झाल्याचे सांगून जाणे चुकीचे आहे. आधीच सांगितले असते तर सदस्यांचा वेळ वाया गेला नसता. कोरम पूर्ण असताना सभा रद्द करण्यासाठी काय संकट आहे, हे कळेना गेले.``

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Zillah Parishad Online Meeting news