esakal | बिबट्या जेरबंद, पण नरभक्षक की दुसराच? आष्टी, पाथर्डी तालुक्यातील गावांत दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

1ANIMAL_0

आष्टी तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या पाथर्डी (जि.नगर) तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असताना आज गुरुवारी (ता.पाच) पहाटे एक बिबट्या तालुक्यातील सावरगाव परिसरातील डोंगरावर पिंजऱ्‍यात जेरबंद झाला आहे.

बिबट्या जेरबंद, पण नरभक्षक की दुसराच? आष्टी, पाथर्डी तालुक्यातील गावांत दहशत

sakal_logo
By
अनिरूद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : आष्टी तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या पाथर्डी (जि.नगर) तालुक्यात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असताना आज गुरुवारी (ता.पाच) पहाटे एक बिबट्या तालुक्यातील सावरगाव परिसरातील डोंगरावर पिंजऱ्‍यात जेरबंद झाला आहे. हा बिबट्या नरभक्षक आहे की दुसराच, याची शहानिशा वन विभागाकडून दुपारी उशिरापर्यंत सुरू होती. पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी व शिरापूर या तीन गावांत नरभक्षक बिबट्याने आठ दिवसांत तीन बालकांना पालकांसमोर उचलून नेत ठार केले. त्यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली. शिरापूर येथील तिसऱ्‍या घटनेनंतर नागरिकांचा मोठा रोष निर्माण झाला.

मंदिरे खुली करा, कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारासमोर साधु-संतांचा एल्गार!


या पार्श्वभूमीवर वन विभागाने नरभक्षक बिबट्याला जिवंत अथवा मृत पकडण्याचे आदेश दिले. त्यासाठी अनुभवी तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले. याशिवाय जळगाव, नाशिक, औरंगाबाद, नगरसह आष्टी तालुक्यातील वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा रात्रंदिवस शोध घेत होते. सुमारे चाळीस ठिकाणी बिबट्यासाठी पिंजरे बसविण्यात आले. परंतु धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या गेल्या आठ दिवसांत सापडला नव्हता. बिबट्याने उच्छाद मांडलेली गावे आष्टी व पाथर्डी तालुक्याच्या हद्दीवरील आहेत. यादरम्यान हा बिबट्या पाथर्डी तालुक्याला लागून असलेल्या आष्टी तालुक्यातील गावांच्या परिसरात आल्याच्या चर्चेने या परिसरात मोठी दहशत पसरलेली आहे.

गुरुवारी पहाटे तालुक्यातील सावरगाव (मायंबा) परिसरातील डोंगर उतारावर लावलेल्या पिंजऱ्‍यात एक बिबट्या जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या नरभक्षकच आहे की इतर याची शहानिशा वन विभाग करीत आहे. कारण या भागात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे पूर्वीपासून बोलले जात आहेत. अनेकांना बिबट्याचे दर्शनही झालेले आहे. त्यामुळे बिबट्या जेरबंद झाला असला तरी तो नरभक्षकच आहे का, याबाबतचा ठाम दावा वन विभागाने अद्याप केलेला नाही. वन विभागाची पूर्ण खात्री होईपर्यंत नागरिकांनी योग्य ती दक्षता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.

उदगीरच्या रेल्वेस्थानकावर मालधक्का उभारणीस मंजुरी

चर्चा ठरली खरी
तीन बालकांना ठार मारून नरभक्षक बिबट्याने उच्छाद मांडलेली मढी, केळवंडी व शिरापूर ही गावे आष्टी तालुक्याला लागून आहेत. डोंगराखाली ही गावे असून, डोंगरावर देऊळघाव घाट, मराठवाडी, शेडाळा, बांदखेल, केळ, अरणविहिरा, मायंबा-सावरगाव हा पट्टा येतो. याच पट्ट्यात नरभक्षक बिबट्या आल्याची चर्चा मागील आठ दिवसांपासून होती. आज सावरगाव परिसरात बिबट्या जेरबंद झाल्याने ती खरी ठरली आहे. सावरगाव परिसरातील डोंगरउतारावर लावलेल्या पिंजऱ्‍यात शिकार म्हणून बोकड ठेवण्यात आला होता. आष्टी तालुक्यातील या परिसरात अनेक पाळीव जनावरे हिंस्त्र प्राण्यांकडून ठार झाली आहेत. त्यामुळे यापूर्वीही बिबट्याचा वावर परिसरात असल्याची चर्चा होती. बिबट्या पकडला गेला तरी तरी नरभक्षक बिबट्याची खात्री न झाल्याने दहशतही कायम आहे.

संपादन - गणेश पिटेकर