उदगीरच्या रेल्वेस्थानकावर मालधक्का उभारणीस मंजुरी

युवराज धोतरे
Wednesday, 4 November 2020

उदगीर येथील रेल्वे स्थानकावर मालधक्का व शेड उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

उदगीर (जि.लातूर) : येथील रेल्वे स्थानकावर मालधक्का व शेड उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे उदगीर येथून धान्याच्या दळणवळणाला सुरुवात होणार आहे. अखेर रेल्वे संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली आहे. उदगीर रेल्वे स्थानकावर निजामकाळात मालधक्का व रेल्वे गोडाऊन सुविधा उपलब्ध होती. कालांतराने ती नामशेष झाली. सीमावर्ती भागाशी जोडलेल्या उदगीरची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असून मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी विक्री होते.

पदवीधर निवडणुकीसाठी सहा हजार आठशे मतदार करणार चौदा केंद्रांवर मतदान

विशेषतः सोयाबीन व तूर या धान्याची मोठी उलाढाल असते. गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी वर्गाने व उदगीर रेल्वे संघर्ष समितीने मालधक्का उभारण्यासाठी मागणी केली होती. उदगीर रेल्वेस्थानकावर यासाठी मुबलक जागाही उपलब्ध आहे. २०१९ मध्ये दक्षिण मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्या उदगीर येथे आले असता व्यापारी, लोकप्रतिनिधी व रेल्वे संघर्ष समितीने त्यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.

दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन ही मंजुरी दिली असून संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले आहे. २०१४ - १५ साली उदगीर येथून ५ कोटी रुपयांच्या मालाचे दळणवळणही करण्यात आले होते. या निर्णयाचे स्वागत बाजार समितीचे सभापती मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील, व्यापारी सागर महाजन, कैलास पाटील, बाळकृष्ण मुक्कावार, कैलास पाटील आदींनी केले आहे. या मागणीसाठी  उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे रमेश अंबरखाने, मोतीलाल डोईजोडे, उमाकांत वडजे, विजय पारसेवार आदींनी पुढाकार घेतला.

हिवाळ्यातील आहारात करा स्निग्धपदार्थ, बियायुक्त भाज्यांचा समावेश

बीओटी तत्त्वावर शीतगृह व व्यापारी संकुल उभारावे
या स्थानकावर मुबलक जागा उपलब्ध आहे. रेल्वे प्रशासनाने बीओटी तत्त्वावर शीतगृह व व्यापारी संकुल उभारण्यास मंजुरी द्यावी जेणे करून येथील व्यापाऱ्यांना माल दक्षिण आणि उत्तर भारतात पाठवण्यात मदत होईल अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goods Carrier Facility Will Set Up At Udgir Railway Station