esakal | कंधार परिसरात वादळी वाऱ्यांसह वीज यंत्रणेला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कंधार उपविभागांतर्गत येणाऱ्या तीन उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाला. या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे तब्बल ५७ गावे अंधारात गेली.

कंधार परिसरात वादळी वाऱ्यांसह वीज यंत्रणेला फटका

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर वीजयंत्रणा कोलमडू नये म्हणून महावितरणचे कर्मचारी, अधिकारी डोळ्यात तेल घालून उपकेंद्रामध्ये कार्यरत असतानाच दुसरीकडे सोमवारी (ता. सहा) दुपारी चार वाजता कंधार तालूक्याच्या परिसरात सुरू झालेल्या वादळी वारा व गारांच्या पावसामुळे कंधार उपविभागांतर्गत येणाऱ्या तीन उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाला. या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे तब्बल ५७ गावे अंधारात गेली. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देत दहा तासात ५७ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करत १३ हजार ७७० वीजग्राहकांना दिलासा दिला.

सध्या राज्यात 'लॉकडाऊन' ची मानसिकता स्विकारत महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असतानाच सोमवारी चार वाजता अचानक सुरू झालेल्या वादळी वारा व गारांच्या पावसाने कंधार उपविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या कंधार ते फुलवळ ३३ केव्ही वीजवाहीनीवर बिघाड झाल्याने ३३ केव्ही फुळवल उपकेंद्र, ३३ केव्ही दिग्रस उपकेंद्र आणि ३३ केव्ही पेठवडज उपकेंद्राच्या परिसरातील ५७ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला. परिणामी या परिसरातील १३ हजार ७७० वीजग्राहकांना विजेविना अख्खी रात्र काढावी लागते की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी तातडीने दुरूस्ती करावयाच्या सुचना देत संबंधीत अधिकारी व एजन्सीला सुचना केल्या.

हेही वाचा -  ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नांदेडला फज्जा

३३ केव्ही वीजवाहीनीवरील काही पोल तुटले, खांब वाकले

महावितरणच्या कंधार उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड यांनी कुठे कुठे पडझड झाली आहे याची पाहणी केली. ३३ केव्ही वीजवाहीनीवरील काही पोल तुटल्याचे, तारा लोंबकळत असल्याचे लक्षात आले. देखभाल दुरूस्तीचे काम करणारी दिनेशराज इलेक्ट्रोपॉवर एजन्सीला सुचना करत त्वरीत कामाला सुरवात केली. पाऊस व वारा सुरूच असल्यामुळे प्रत्यक्ष दुरूस्तीचे काम सुरू करेपर्यंत अंधार पडून गेला. मात्र अंधाराची पर्वा न करता वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे उदिष्ट समोर ठेवत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एजन्सीच्या कामगारांना सोबत घेत बॅटरी व मोबाईल बॅटरीच्या अंधुक प्रकाशात काम सुरू केले. दुपारी चार वाजता खंडीत झालेला वीजपुरवठा मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनीटाला पुर्ववत केला. 

यांनी घेतले परिश्रम 

या दहा तासाच्या अविश्रांत कामामध्ये कंधार ग्रामीणचे सहायक अभियंता न. बी. ननावरे, पेठवठजचे कनिष्ठ अभियंता जी. एन. दहे, कुरुळा शाखेचे सहायक अभियंता बी. एम. राठोड, कंधार उपविभागाचे  सहायक अभियंता एस. एस. गच्चे त्याचबरोबर कंधार ग्रामीण शाखाचे कर्मचारी एस. पी. वाघमारे, के. डी. वाघमारे, अे. जे. शेख, एम. जक्कलवाड, अे. डी. शेख, बी. जे. कांबळे तसेच कामाजी वाघमारे कार्यरत होते. 

loading image