esakal | लॉकडाऊनचा माफीयांनी असाही घेतला फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

NND28KJP01.jpg

सध्या नांदेड तालुक्यातील वाजेगावचा खालचा भाग तसेच मुदखेड तालुक्यातील वासरी, देवापूर या उच्च पातळी बंधाऱ्याचे पाणी या भागातील नदीला असल्याने वाळू पाण्याखाली आहे. यामुळे वाळू उपशासाठी सक्शन पंप लावण्यात येतात. यासाठी बोटीची व्यवस्था केली जाते.

लॉकडाऊनचा माफीयांनी असाही घेतला फायदा

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : प्रशासन कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी व्यस्त असताना अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी या संधीचा फायदा घेत गोदावरी नदीतुन वाळू उपसा करण्याचे काम सुरु केले. या बाबत महसुल व पोलिस प्रशासनाने कार्यवाही करत वाळू उपसा करणारे सक्शन पंप नष्ट केले.

मुदखेड व नांदेड तालुका हद्दीत वाळू उपसा 
जिल्ह्यातील मुदखेड व नांदेड तालुक्‍यातील गोदावरी नदीपात्रात मुगट गावातील एका नाल्‍यात तीन बोटी लपवून ठेवलेल्‍या आढळल्‍या. या बोटीच्‍या सहाय्याने नांदेड व मुदखेड तालुक्‍यातील गावांमध्‍ये रात्रीच्‍यावेळी वाळू उपसा होत होता. दिवसा या तीन बोटी मुगट गावातील नाल्‍यात लपवून ठेवण्‍यात येत होत्‍या. या बोटी गस्‍तीवर असलेल्या महसुल पथकाच्या निदर्शनास झाल्या. दोन्‍ही तालुक्‍याच्‍या सिमेवर महसूल पथके गुरुवारी (ता. २६) सकाळपासून त्‍यांच्‍या मागावर होते. दुपारी तीन वाजता नांदेड तालुक्‍याच्‍या पथकाला या बोटी मुगट गावात सापडल्‍या. त्‍यांनी याबाबत तत्‍काळ वरीष्‍ठांना कळविले. वरीष्‍ठांच्‍या आदेशानुसार जिलेटिन स्‍फोटके लावून सायंकाळी सहा वाजता या बोटी नष्‍ट करण्‍यात आल्‍या.

हेही वाचा....गावठी दारु विक्रेत्यांचे चांगभलं

संयुक्त पथकाची कार्यवाही 
ही कार्यवाही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, नांदेड तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड, मुदखेड तहसीलदार  दिनेश झांपले, नायब तहसीलदार शमुगाजी काकडे, संजय नागमवाड, मंडळ अधिकारी अनिरुध्‍द जोंधळे, कोंडीबा नागरवाड, गजानन नांदेडकर, खुशाल घुगे, हायुम पठाण, बी. डी. कुऱ्हाडे, तलाठी माणिक बोधगिरे, कैलास सुर्यवंशी, राहूल चव्‍हाण, आकाश कांबळे, रवि पल्‍लेवाड, वाहन चालक गजानन काळे, जहीरोद्दीन तसेच मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी यांनी पुर्णत्‍वास नेली. 

हेही वाचलेच पाहिजे....कोरोनाच्या भितीने शंभर कुटुंबाचा जिव टांगणीला

अवैध वाळू उपशाविरुध्द मोहिम
जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी अवैध वाळू उत्‍खनन करणाऱ्यांविरुद्ध कडक धोरण अवलंबिले आहे. गोदावरी नदीपात्रात स्वत: उतरुन वाळू माफीया विरुध्द कार्यवाही केल्याने महसुल कर्मचारी ॲक्शन मोडमध्ये येवून कार्यवाही सुरु केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या भागातून वाळूचा अवैध उपसा होइल त्या गावातील सरपंच तसेच पोलिस पाटील यांना जबाबदार धरण्याचा इशारा देखील दिला आहे. यातुनच ही कारवाइ झाली. यापुढेही अवैध वाळू उपशाविरोधात अशीच कठोर कार्यवाही करण्‍याचे डॉ. विपीन यांनी सांगितले आहे.

नदीत पाण्यामुळे लावले सक्शन पंप
सध्या नांदेड तालुक्यातील वाजेगावचा खालचा भाग तसेच मुदखेड तालुक्यातील वासरी, देवापूर या उच्च पातळी बंधाऱ्याचे पाणी या भागातील नदीला असल्याने वाळू पाण्याखाली आहे. यामुळे वाळू उपशासाठी सक्शन पंप लावण्यात येतात. यासाठी बोटीची व्यवस्था केली जाते. याव्दारे वाळू उपसा करत असल्याचे प्रकार यापूर्वी अनेकवेळा उघड झाले होते. असाच काहीसा प्रकार झाल्याने महसूल पथकाने कारवाइ केली.    

loading image