विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत महामोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 December 2019

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एका विद्यार्थिनीवर क्रीडा शिक्षकाने अत्याचार केला. या प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटू लागले असून, शुक्रवारी (ता. 20) अंबाजोगाई शहरात महामोर्चा काढून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

अंबाजोगाई (जि. बीड) - क्रीडा शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 20) अंबाजोगाईकरांतर्फे निषेध महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवतींचा मोठा सहभाग होता. या घटनेतील आरोपी श्‍याम वारकड यांस फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी 
मोर्चातर्फे करण्यात आली. 

डॉ. आंबेडकर चौकातून सकाळी साडेअकराला मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील नगरपालिका, बसस्थानक, सावरकर चौक, पंचायत समिती, छत्रपती शिवाजी चौकमार्गे उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा पोचला. यावेळी मोर्चातील पाच विद्यार्थिनींनी सर्वांच्या वतीने उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना मागणीचे निवेदन दिले. 

हेही वाचा - बीडमध्ये पोलिसांसह वाहनांवर दगडफेक, अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या

मोर्चात प्रा. अरुंधती पाटील, प्रतिभा देशमुख, अंजली पाटील, ऍड. सुभाष शिंदे, रवी देशमुख, राजेश वाहुळे, धीमंत राष्ट्रपाल, संजय दौंड, बन्सी जोगदंड, बाळासाहेब सोनवणे, प्रा. एस. पी. कुलकर्णी, रोटरीचे अध्यक्ष प्रा. सचिन कराड, इनरव्हीलच्या सुहासिनी मोदी, वैजयंती टाकळकर, प्राचार्य उदय जोशी, मुख्याध्यापिका वर्षा चौधरी, कुंदा व्यास व विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिकांनी या निषेध महामोर्चात सहभाग घेतला. दरम्यान, मोर्चादरम्यान विद्यार्थिनींनी शिवाजी चौकात सामाजिक वास्तवतेवर पथनाट्यही सादर केले. यातून समाजाने बोध घेण्यासारखे होते. 

हेही वाचा - बीड जिल्ह्यात गर्भवती नवविवाहितेचा मृतदेह आढळला, खुनाचा आरोप

कार्यालयासमोर धरणे 
विद्यार्थिनी व मोर्चातील इतर सहभागी महिला व कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोरील रस्त्यावर तासभर धरणे धरली. मोर्चातील काही महाविद्यालयीन युवतींनी भाषणे केली. मुलींना व महिलांना सुरक्षितता मिळावी पाहिजे, विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या त्या शिक्षकांस फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली. त्यानंतर महामोर्चा विसर्जित करण्यात आला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maha Morcha in Ambajogai protesting against student torture