
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, तूर, ऊस आदी शेतातील सर्व पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
निलंगा (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, तूर, ऊस आदी शेतातील सर्व पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली निलंगा तालुक्यातील केळगाव येथे लातूर-जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता.२०) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पिकाने डोलणारी शेती झाली उद्ध्वस्त, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले
जिल्ह्यासह तालुक्यात अतिवृष्टी झाली असून याची नोंद जर शासनाकडे आहे. तर ती एक नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे पाहणी दौरे, पंचनामे, पोकळ घोषणा या बाबी वरून वेळ वाया न घालवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजाराची मदत करावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. शेवटी प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हा रास्ता रोको तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देऊन थांबवण्यात आला. जिल्ह्यात एकाच दिवशी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो, जगावं कसं बघा आम्ही?' संभाजीराजे झाले भावूक.
शासनाने त्वरित मदत नाही केली, तर अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढेल व त्यात हे सरकार वाहून जाईल असे डॉ. भिकाणे म्हणाले. राज्यावरील आर्थिक संकटाचे बनावट कारण पुढे करून जर मदत करणार नसाल तर मनसे खळ खट्याक आंदोलनाचा तीव्र प्रत्यय देईल असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात मनसे तालुकाध्यक्ष सुरज पटेल, उपाध्यक्ष नजीर मुजावर, शहराध्यक्ष प्रदीप शेळके, जाकिर शेख, शरपू शेख, गणेश उसनाळे, इम्रान शेख, अबू सय्यद, प्रवीण परळे, रेवन कोकरे, शिवदर्शन काळे, पवन काळे, विनोद जकापुरे, शाफिक मुजावर, धनाजी राठोडकर, अरबाज पठाण, दत्ता काळे, नवीन पांढरे, पद्माकर पेठकर, मदार माकने, उस्मान शेख, अतुल शेख, उत्तम सूर्यवंशी, समीर शेख, ओम घोलप, जावेद शेख, मेहबूब मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर