esakal | अर्थसंकल्पात मराठवाड्याला काय काय मिळाले, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

विधिमंडळात अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसह सर्व समाजघटकांच्या हिताच्या काही योजनांची घोषणाही केली. यात मराठवाड्याच्या पर्यटन, पाणी, तीर्थक्षेत्र आणि उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजनांमधून निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 

अर्थसंकल्पात मराठवाड्याला काय काय मिळाले, वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ६) विधानसभेत सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे मराठवाड्याला ठाकरे सरकार काय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. 

विधिमंडळात अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसह सर्व समाजघटकांच्या हिताच्या काही योजनांची घोषणाही केली. यात मराठवाड्याच्या पर्यटन, पाणी, तीर्थक्षेत्र आणि उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजनांमधून निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

उच्च व तंत्रशिक्षण विभागाला 12 उत्कृष्ट केंद्रे-सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्यासाठी 1300 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यात औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालयात, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा समावेश असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या पाणीटंचाई असलेल्या गावांसाठी त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कायम करण्याची आणि त्यासाठी मोठा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. उस्मानाबाद, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी उजनी येथून पाणी पुरवठा योजनेची चाचपणी करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

तीर्थक्षेत्र विकास योजनेत नांदेड जिल्ह्यातील माहूरगड, हिंगोली जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, संत नामदेव यांचे गाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव, तसेच शिर्डीच्या साईबाबांचे जन्मस्थान असल्याचा दावा करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत विकासकामे करण्यासाठी निधी दिला जाईल, असे श्री. पवार म्हणाले. 

त्याचबरोबर महापुरुषांच्या आणि लोकनेत्यांच्या स्मारकांसाठी काही राखीव निधी ठेवण्यात आला आहे. यात नांदेड येथील शंकरराव चव्हाण, लातूरला विलासराव देशमुख आणि बीडला गोपीनाथ मुंडे यांची स्मारके उभारण्यासाठी निधी देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

परभणी येथील कवी केशव खटींग यांच्या 'माय झाली सरपंच, दोरी झेंड्याची ओढते' या कवितेचा उल्लेख करून महिला व बालविकासाच्या योजनांची घोषणा केली. 

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा