ऊसतोड कामगारांना घरी पाठविण्याबाबत निर्णय घ्या - पंकजा मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

ऊसतोड कामगार गेल्या पंधरा दिवसांपासून अलगीकरणात आहेत. त्यांना मूळगावी पाठविण्याचा तीन ते चार दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

बीड - ऊसतोड कामगारांचा विषय अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील आहे, तो गंभीर आणि हाताबाहेर जाण्याआधी यात लक्ष घालावे. कामगार गेल्या पंधरा दिवसांपासून अलगीकरणात आहेत. त्यांची रॅंडमली तपासणी व चेकपोस्ट करावे आणि त्यांना मूळगावी पाठविण्याचा तीन ते चार दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

ऊसतोड कामगारांना कारखान्यांनी काही विशिष्ट ठिकाणी ठेवले आहे. हेच मुळात आपल्या अलगीकरण नियमाच्या विरुद्ध होण्याची शक्यता आहे. ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव लोकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यांना वेळोवेळी व्हिडिओ कॉलवर बोलून संयमाचे आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून... 

दोन दिवसांत कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काहीही झाले तरी आम्ही १४ तारखेनंतर थांबणार नाही असा कामगारांचा पवित्रा असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांची समिती नेमून त्यांना अधिकार द्यावेत.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  

समितीने आठ - दहा दिवसांपासून एकत्र राहणाऱ्या कामगारांची रॅंडमली तपासणी करून कुणीच कोविड १९ पॉझिटिव्ह आढळले नाही तर हा ग्रुप सेफ समजावा व त्यांना गावी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली आहे. कुणी पॉझिटिव्ह आढळून आले तर नियमाप्रमाणे त्यांना क्वारंटाइन, आयसोलेशन व्यवस्थित करता येईल आणि आवश्यक इलाजही देता येईल असे त्यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make the decision to send homeless workers - Pankaja Munde