जालना जिल्ह्यात कार-दुचाकीची समोरासमोर जोराची धडक; एक ठार, तर पाच जण गंभीर जखमी

बाबासाहेब गोंटे
Thursday, 26 November 2020

जालना-बीड महामार्गावरील अंबड शहरालगत असलेल्या झिरपी फाट्याजवळ बुधवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान कार व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन दोन्ही वाहने सिमेंट रस्त्यावरून खाली खड्ड्यात जाऊन पलटी झाले.

अंबड (जि.जालना) : जालना-बीड महामार्गावरील अंबड शहरालगत असलेल्या झिरपी फाट्याजवळ बुधवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान कार व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन दोन्ही वाहने सिमेंट रस्त्यावरून खाली खड्ड्यात जाऊन पलटी झाले. दोन्ही वाहनांची दुरवस्था बिकट झाली आहे. यामध्ये दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील गोंदी येथील औषधी दुकानदार शकुर सौदागर हा अंबड शहरातून धाकलगाव येथे औषध दुकानावर आपल्या दुचाकी वरून चालला होता. तर सुखापुरी येथील सुभाष पटेकर हे रायगड जिल्ह्यातील निजामपूर येथील तिघांना व अंबड शहरातील एकाला कारमधून ऊसतोड मजुराला अंबड शहराकडे कारमधून स्वेटर, लहान मुलांना कपडे आदी साहित्य खरेदी करण्यासाठी येत असताना झिरपी फाट्याजवळ दुचाकी व कारची जोराची धडक होऊन कारमधील सुभाष पटेकर (रा.सुखापुरी ता.अंबड), पंडीत गायकवाड(अंबड), गोटू चंदर जाधव, दिलीप नीलम, बाळकृष्ण जाधव(जि.रायगड, निजामपूर)हे गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असून यातील सुभाष पटेकर, पंडित गायकवाड यांना पुढील उपचारासाठी  जालना येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शकुर गफूरभाई सौदागर यांच्यावर अंबड येथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अपघात स्थळ व उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Died In Car -Two Accident Ambad Jalna News