दुचाकीला कट मारणे पडले महागात, मारहाण करुन एकाचा निर्घृण खून

अविनाश काळे
Monday, 11 January 2021

या घटनेमुळे थोरलेवाडीत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव तपास करित आहेत.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : जुन्या जागेचे भांडण आणि दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून पंधरा जण एकत्र येवून दोघांना काठी व कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास तालुक्यातील थोरलीवाडी गावात घडली. या बाबत पोलिसांनी सांगिलेली माहिती अशी की, थोरलीवाडी येथे रविवारी (ता.दहा) सकाळी दहा वाजण्याचे सुमारास बालाजी गुंडाप्पा मिसाले, रणजीत भिमसु मेकाले यांच्यासह काही मंडळी ग्रामपंचाय कार्यालयासमोर बसले होते.

त्या वेळी गोविंद गोपाळ कोराळे तेथे आला आणि महादेव गोपीचंद खवडे यांनी माझ्या दुचाकीला कट मारली आहे. तेव्हा येथील लोकांनी ही बाब महादेवच्या वडिलांच्या कानावर घालण्यास सांगितले. गोविंद रस्त्याच्या बाजूला असताना  महादेवचे वडील गोपीचंद खवडे तेथे आले. त्यावेळी गोविंदने गोपीचंद यांना मुलगा महादेवने माझ्या दुचाकीला कट मारल्याची तक्रार करीत असताना महादेव त्याचा चुलत भाऊ रायाप्पा पांडुरंग खवडे या दोघांनी गोविंद कोराळे याच्या डोक्यात व पाठीवर मारहाण करून जखमी केले, त्याच्यावर उमरग्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या लोकांनाही महादेव खवडे व रायाप्पा खवडे यांनी ठार मारण्याची धमकी दिली. मारहाणीच्या या प्रकारानंतर महादेव व रायाप्पा दोघे अंगणवाडीकडे गेले. त्यांनी अंगणवाडीच्या बाजुला त्यांच्या साथीदारांना बोलावुन घेतले. दरम्यान रायाप्पाचे व हणमंत परसराम या दोघात जागेच्या कारणावरून जुना वाद होता. तो हणमंतच्या जीवावर उठला. महादेव गोपिचंद खवडे, रायाप्पा पांडुरंग खवडे, भिम नरसाप्पा खवडे, लिंबाजी व्यंकट चंडकापुरे, नागनाथ सायबन्ना कोराळे, भरत पापु खवडे, रूपचंद भद्रीनाथ कोराळे, रामदास हुसेनी खवडे, नागनाथ रावजी व्हनाळे, गोपिंचद भद्रीनाथ कोराळे, सायबन्ना सुधाकर एंपाळे, विजय रघुनाथ दापेगावे, अंबक तुकाराम खवडे, रायाप्पा हणमंत कोराळे, लक्ष्मण हुसेनी खवडे (सर्व रा. थोरलीवाडी, ता.उमरगा) या पंधरा जणांनी कुऱ्हाडी, तलवारी व काठ्याने हणमंत परसराम याला हा गंभीर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बालाजी गुंडाप्पा मिसाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंधरा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे थोरलेवाडीत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव तपास करित आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Man Killed Over Minor Casue In Umarga Osamanabad Latest News