आता इथे भरणार ग्रामीण साहित्य संमेलनाचा मेळा

सयाजी शेळके
Friday, 24 January 2020

पळसपमध्ये दोन फेब्रुवारीला

आठवे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन

उस्मानाबाद : पळसप (ता. उस्मानाबाद) येथे दोन फेब्रुवारीला आठवे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत यांची निवड झाली आहे. स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी शुक्रवारी (ता. 24) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संमेलनाची जय्यत तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले. 

आमदार काळे म्हणाले, शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे हे संमेलन घेतले जाते. शिक्षणमहर्षी वसंतराव काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबविला जातो. यंदाचे संमेलन आठवे असून ते दोन फेबुवारीला होईल.

संमेलनस्थळास 'शिक्षणमहर्षी वसंतराव काळे साहित्यनगरी' नाव देण्यात आले आहे. सकाळी साडेदहाला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, आमदार कैलास पाटील आदी प्रमुख पाहुणे असतील.

वाचा - पुन्हा उफाळला नामांतराचा वाद

दुपारी दीडला "कृषी साक्षरता : काळाजी गरज' या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. ठोंबरे असतील. प्रा. डॉ. उद्धव आळसे, प्रगतिशील शेतकरी नवनाथ कसपटे, राजशेखर पाटील परिसंवादात सहभागी होतील. दुपारी तीनला कथाकथन होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कथाकार शिलवंत यादये असतील. प्रभाकर शेळके, विवेक गंगणे, नयन राजमाने आदी सहभागी होतील.

दुपारी चारला प्रा. डॉ. वि. रा. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. सायंकाळी सहाला संमेलनाध्यक्ष दत्ता भगत यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. मधू सावंत, आमदार धीरज देशमुख उपस्थित राहतील. 

ग्रंथदिंडी, ग्रंथ, चित्रप्रदर्शन

दोन फेब्रुवारीला सकाळी आठला कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिदे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला सुरवात होईल. संमेलनस्थळी ग्रंथप्रदर्शन भरविले जाणार असून सकाळी दहाला उस्मानाबादचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. सकाळी सव्वादहाला प्रसिद्ध कलावंत मंगेश निपाणीकर चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन करतील.

क्लिक करा - ठाकरेंच्या कॅबिनेटवर ठाकरेंचेच शॅडो कॅबिनेट

किशोर शितोळे यांच्या व्यंगचित्रांसह सौदागर बेघनाजे यांनी संग्रहित केलेल्या पुरातन नाणी, वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. रात्री आठला शिवकुमार मोहेकर यांचा संगीत दरबार, तसेच वसंतोत्सव सांस्कृतिक मंचतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

कर्करोग तपासणी शिबिर

संमेलनाच्या आदल्या दिवशी, एक फेब्रुवारीला बार्शीतील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, "आयएमए'तर्फे मोफत कर्करोग तपासणी शिबिर होणार आहे. प्रा. गोविद इंगळे महाराज अहमदपूरकर यांचे कीर्तनही होईल. मराठवाड्यातील साहित्यिक, रसिक, शिक्षक, प्राध्यापक, नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलन संयोजन समितीने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Gramin Sahitya Sammelan In Osmanabad