मराठवाड्याचा तारांक अवघ्या कमी वयात बनला गेम डेव्हलपर, वडील आहेत भारतीय सैन्यात

प्रविण फुटके
Sunday, 4 October 2020

मराठवाड्याचा तारांक आयाचित या दहा वर्षाच्या मुलाला कमी वयात गेम डेव्हलपर होण्याचा सन्मान पटकाविला आहे.

परळी वैजनाथ (जि.बीड) : परळी वैजनाथची जशी राजकारणात सर्वत्र ओळख आहे. तसेच अनेक रत्नांची खाण आहे. विविध क्षेत्रात येथील माणस आपापल्या कार्याचा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त करतात. यामध्ये येथील बालकेही मागे नाहीत. शहरातील जुन्या नांदुरवेस या गावभागातील रहिवासी असलेल्या केवळ १० वर्षे वयाच्या मुलाने जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर होण्याचा सन्मान पटकाविला आहे.

भारतीय सैन्यात कार्यरत असलेले इंद्रजित आयाचित सध्या लडाखमध्ये नेमणुकीवर आहेत. त्यांच्या चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षांचा मुलगा तारांक इंद्रजीत आयाचित हा सध्या अहमदाबाद येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये आहे. व्हाइट हॅट ज्युनियर ही एक मुंबईतील एजटेक स्टार्टअप आहे. ज्यामध्ये तरुण मुलांना कोडिंग शिकविण्यावर भर दिला जातो. मुलांसाठी (वय ६ ते १८) ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून प्रोग्रामिंग शिकण्यास तयार केले जाते. त्यानंतर गेम, अ‍ॅनिमेशन आणि अनुप्रयोग (ॲप्स) तयार करण्यास प्रोत्साहित केले जाते.

मशीनसमोर उभे राहा; कळेल शरीराचे तापमान, मिळतील ग्लोव्हज, मास्क! औरंगाबादकर...

यामध्ये मुलांना स्वतःचे क्रिएशन करुन सादरीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. व्हाइट हॅट ज्युनियर व्यासपीठावरील पहिल्या १५ मुलांना त्यांच्या स्वत:च्या स्टार्ट-ॲप्स तयार करण्यास आणि त्यांना फेलोशिप प्रदान करण्यास मदत करते. तसेच सिलिकॉन व्हॅलीची भेट घडवली जाते. या चॅलेंजमध्ये तारांक आयाचित याने स्वत:ची छाप पाडली असुन तो जगातील सर्वांत कमी वयाचा गेम डेव्हलपर ठरला आहे.

सृजन (क्रिएटिव्हिटी) क्षेत्रात त्याने कमी वयात बुद्धिमत्ता व प्रतिभा सिद्ध केली असुन जागतिक स्तरावर परळीचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या उत्तुंग भरारीबद्दल सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशसेवा बजावणाऱ्या भारतीय जवान इंद्रजीत आयाचित या बापाच्या डोळ्यात मात्र आपल्या चिमुकल्याच्या यशाने आनंदाश्रु तरळून आले आहेत. आपल्या मुलाचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया इंद्रजीत आयाचित यांनी व्यक्त केली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada's Tarank Ayachit Become Younger Game Developer