esakal | अनेक वर्षांपासूनची उस्मानाबादकरांची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी अखेर मंजूर, शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमता
sakal

बोलून बातमी शोधा

Medical College Sanction For Osmanabad

गेल्या अनेक वर्षांपासूनची उस्मानाबादकरांची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाल्याने शहरातील शिवाजी महाराज चौकात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

अनेक वर्षांपासूनची उस्मानाबादकरांची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी अखेर मंजूर, शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमता

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयास बुधवारी (ता. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात शिरपेचाचा तुरा रोवल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची उस्मानाबादकरांची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाल्याने शहरातील शिवाजी महाराज चौकात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान आता पुढील कार्यवाहीला कधी गती मिळते, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यात मेडीकल कॉलेज असावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना याबाबतची चर्चा सुरू होती. मात्र त्याला मूर्त स्वरूप मिळाले नाही. मात्र सध्या लातूरचे असलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याबाबत लक्ष घातले होते. त्यानुसार बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


शहरात जिल्हा प्रशासनाची २६.५ एकर जागा होती. ती जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर याला गती मिळण्याचे संकेत आले होते. त्यानुसार आता शहरात १०० विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय मंजूर करण्यात आले असून त्याला सलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


महाआघाडीचा जल्लोष
मंत्रिमंडळात निर्णय झाल्यानंतर महाआघाडीच्या वतीने शहरातील शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोश केला. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, राष्ट्रवादी तसेच शिवसेना, काँग्रेसचे नगरसेवक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील कार्यवाहीकडे लक्ष
आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याने जिल्हावासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र आता प्रत्यक्षात केव्हापासून याची अंमलबजावणी होणार. याकडे जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited - Ganesh Pitekar