esakal | ‘व्हॅलेनटाईन डे’ला रितेश-जेनेलिया घेणार...
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण

येत्या ‘व्हॅलेनटाईन डे’ला नांदेडमध्ये एक मेगा मुलाखत रंगणार असून त्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. रुपेरी पडद्यावरील ही जोडी मराठवाड्यातील असून ती राजकारणात लोकप्रिय असलेल्या जोडीची आणि तीही मराठवाड्यातीलच असून त्यांची मुलाखत घेणार आहे.

‘व्हॅलेनटाईन डे’ला रितेश-जेनेलिया घेणार...

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - येत्या ‘व्हॅलेनटाईन डे’ला नांदेडमध्ये एक मेगा मुलाखत रंगणार असून त्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. रुपेरी पडद्यावरील ही जोडी मराठवाड्यातील असून ती राजकारणात लोकप्रिय असलेल्या जोडीची आणि तीही मराठवाड्यातीलच असून त्यांची मुलाखत घेणार आहे. त्यामुळे ‘व्हॅलेनटाईन डे’च्या निमित्ताने या मुलाखतीची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. 

येत्या शुक्रवारी (ता. १४) नांदेडमध्ये महाराष्ट्राची मेगा मुलाखत रंगणार आहे.  या मध्ये रूपेरी पडद्यावरील सुपरिचित दाम्पत्य रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख हे राजकारणातील लोकप्रिय दाम्पत्य राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांची विशेष मुलाखत घेणार आहेत.

हेही वाचा - पिझ्झाच्या नावाखाली आॅनलाईन ९० हजाराला गंडा

अनेक ज्ञात - अज्ञात प्रश्नांची मिळणार उत्तरे
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै) डॉ. शंकरराव चव्हाण हे कौटुंबिक आयुष्यात कसे होते? करड्या शिस्तीचे भोक्ते असलेल्या ‘नानां’च्या हृदयाचा हळवा कोपरा कोणता होता? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले? अशा अनेक ज्ञात - अज्ञात प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आणि त्या निमित्ताने त्यांच्या आयुष्याचे समग्र दर्शन घडविण्यासाठी ‘आनंदाचे डोही’ या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - या सरकारला चांगली बुद्धी दे : चंद्रकांत दादांचे तुळजाभवानीला साकडे

‘व्हॅलेनटाईन डे’चीही जोड... 

डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असला तरी योगायोगाने ता. १४ फेब्रुवारीला व्हॅलनेटाईन डे (प्रेमाचा दिवस) असल्यामुळे दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. त्यातच मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे या दोन्ही जोड्या त्या अनुभवातून गेल्या आहेत. त्यामुळे या मुलाखतीत प्रेमाची चर्चा तर होणारच आणि त्याला तरुणाईदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. १४ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणावर ही मुलाखत होणार आहे. कॉँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह अनेकांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.