
मनोरुग्ण तरुणाच्या वागणुकीने अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी. औरंगाबादेतील घटना.
औरंगाबाद : ‘‘नमस्कार... मी ‘नासा’साठी काम करतो. माझं कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलणं झालंय. पृथ्वीच्या संवर्धनासाठी माझा रोल महत्त्वाचा आहे. अमेरिकेने माझ्यासाठी ७० हजार कोटी रुपये पाठवलेत, ते मी विड्रॉल करण्यासाठी बॅंकेत आलोय...पण बॅंकेवाले देईनातच राव...!’’
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
ही तक्रार कुण्या जगविख्यात उद्योजकाची नव्हे तर एका तरुणाने सकाळी सकाळीच बॅंकेत येऊन करून खळबळ उडवून दिली. त्याने सिडकोतील एका खासगी बॅंकेत चेक दिला. चेकवरील ७० हजार कोटींचे आकडे पाहून अधिकाऱ्यांची भंबेरीच उडाली. काही वेळ बॅंकेतही धमाकाच झाला. हा काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी पोलिसही बॅंकेत दाखल झाले. अखेर तो मनोरुग्ण असल्याचे उघड झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कॅनॉट प्लेस भागातील एका खासगी बॅंकेच्या शाखेमध्ये शनिवारी (ता.तीन) सकाळी अकरा वाजता हा तरुण आला. स्वतःचे नाव ओम पंकजा असल्याचे सांगणाऱ्या या तरुणाने तब्बल ७० हजार कोटी रुपये विड्रॉल करण्यासाठी चेक दिला. चेकवरील आकडे बघून बॅंक अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. त्या तरुणाला अधिक विचारपूस सुरू केल्यानंतर तो आक्रमक व्हायला लागला. त्यामुळे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सिडको पोलिस ठाण्याचे बीट मार्शल विशाल गाडे, श्री. सोनवणे यांनी बॅंकेत जाऊत तरुणाला विचारपूस करत विश्वासात घेत सिडको पोलिस ठाण्यात आणले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी साधासुधा नाही!
पोलिसांनी काहीसे गोडीगुलाबीने विचारल्यावर ओम पंकजा बोलू लागला. त्याने पोलिसांना सांगितले, की, मी पृथ्वीला ‘प्रोटेक्ट’ करण्यासाठी ‘नासा’सोबत काम करत आहे. मला अमेरिकेने खूप मोठी संधी दिलेली आहे. कालच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलणे झाले आहे. आतापर्यंत मला अमेरिकेत जाण्याची गरज पडली नाही; मात्र नासाच्या शास्त्रज्ञांची रोजच बोलणे होत असते. आम्ही मिळून पृथ्वीसाठी काम करत आहोत. मला आता पाकिस्तान, अफगाणिस्तान, लडाख, काश्मीर, नेपाळ हा सर्व भूभाग मिळाला आहे. त्याची मोजणी काही अजून केलेली नाही; मात्र मी लवकरच मोजणी करून घेणार आहे. अमेरिकेने मला १३ चेक दिले; पण बॅंक पैसे देतच नाही. चेक प्रोसेसला दिल्याचे बॅंकेचे अधिकारी सांगत आहेत. तसा मी बॅंकेवरच केस करणार होतो; पण आता बॅंकेनेच माझ्यावर केस केली... तरुणाचे हे ‘कथाकथन’ ऐकून पोलिसांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.
पोलिसांनी केले बोलते
पोलिस निरीक्षक अशोक गिरी, जमादार नरसिंग पवार, रमेश राठोड यांनी त्याची आस्थेवाईक चौकशी केली. त्यानंतर ओम पंकजाने आपले देवगिरी महाविद्यालयात एम. कॉम.पर्यंत शिक्षण झाले आणि सिडकोतील गुलमोहर कॉलनीत राहत असल्याचे सांगितले. त्याला धीर देत बॅंकेकडून सर्व पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा तरुण काहीसा सुखावला. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयाची शोधाशोध करून त्याच्या भावाला शोधून काढले. त्यानंतर ओमला त्यांच्या स्वाधीन केले.
(संपादन-प्रताप अवचार)