
घरात निर्माण होणारा ओला कचरा घराच्या परिसरातच कुजवून त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करावे, या उद्देशाने लातूर महानगरपालिकेच्या वतीने 'मी सौभाग्यवती' ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
लातूर : घरात निर्माण होणारा ओला कचरा घराच्या परिसरातच कुजवून त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करावे, या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने 'मी सौभाग्यवती' ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक घरात ओला व सुका कचरा निर्माण होतो. यातील ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करावी आणि शहर स्वच्छतेच्या उपक्रमात हातभार लावता यावा यासाठी चारही झोनमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
ता.१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीसाठी ही स्पर्धा असणार आहे. ता. १५ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत महापालिकेच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी कशा पद्धतीने कंपोस्टिंगची प्रक्रिया राबवली आहे याची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक झोनमधून तीन महिलांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिलेला मायक्रोवेव्ह ओव्हन, द्वितीय क्रमांकासाठी ज्युसर, मिक्सर ग्राईंडर आणि तृतीय पारितोषिक म्हणून प्रेशर कुकर दिले जाणार आहे.
जे बचत गट होम कंपोस्टिंगला प्रोत्साहन देतील अशा दोन गटांनाही विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत शहरातील अधिकाधिक महिलांचा सहभाग कसा नोंदवता येईल यासाठी स्वच्छताताईंच्या वतीने मार्गदर्शन व माहिती पत्रकांचे वाटप केले जाणार आहे.ज्या स्वच्छताताई अधिक महिलांचा सहभाग करून घेतील त्यांना देखील विशेष पारितोषिके देऊन सन्मानित केले जाणार आहे. शहरातील अधिकाधिक महिलांनी यात सहभाग नोंदवून 'मी सौभाग्यवती' हा सन्मान प्राप्त करावा. शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या कामी हातभार लावावा, असे आवाहन उपायुक्त मंजुषा गुरमे यांनी केले आहे.
Edited - Ganesh Pitekar