
महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या पाचोड (बुद्रुक) गावच्या ग्रामपंचायतीसाठी त्यांचे विरोधक एक झाले आहेत.
पैठण: महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या पाचोड (बुद्रुक) गावच्या ग्रामपंचायतीसाठी त्यांचे विरोधक एक झाले आहेत. भाजप, राष्ट्रवादीसह भुमरे यांच्या सख्ख्या मामांच्या मुलांनी देखील त्यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक काळ या ग्रामपंचयात व संरपचपदावर भुमरे कुटुंबीय किंवा त्यांच्या विश्वासू व्यक्तींचेच वर्चस्व राहिलेले आहे.
राज्यातील बऱ्याच लोकप्रतिनिधी, मंत्री, नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आणण्यासाठी निधीची घोषणा केली आहे. पण कॅबिनेट मंत्री असलेल्या भुमरे यांना आपलीच ग्रामपंचायत पुन्हा ताब्यात घेण्यासाठी विरोधकांशी एकवटीने लढावे लागणार आहे.
आजोबा तुमच्या जिद्दीला सलाम; नातवाला शिकवण्यासाठी कॅलेंडरविक्रीतून स्वप्नाकडे प्रवास
पैठण विधानसभा मतदार संघातील पाचोड ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या १७ आहे. पाचोड (बुद्रुक) हे गाव शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचे मुळगाव आहे. भुमरे यांच्या राजकीय प्रवासाला याच ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली होती. त्यावेळेस पोचोड ग्रामपंचायतीमध्ये भुमरे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडुन आले होते. नंतर त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली व पंचायत समिती सदस्य म्हणून ही ते निवडुनही गेले होते.
पंचायत समिती निवडणुकीत निवडुन आल्यामुळे त्यांना परत कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या पंचायत समितीत उपसभापती पदाची संधी देखील मिळाली होती. काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे ते उपसभापती देखील झाले होते. त्यानंतर पाचवेळा आमदार आणि आता सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना स्थान देण्यात आलं आहे.
राजकारणात नेता कितीही मोठ्या पदावर गेला तरी त्या नेत्याला आपल्या गावावरीन पकड ढिली झालेली कदापी सहन होत नाही. ज्या ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्री गणेशा केला ती गावची ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात रहावी, यासाठी भुमरे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मागील अनेक वर्षांपासुन पाचोडची ग्रामपंचायत त्यांच्याच ताब्यात आहे. या काळात सरपंच पदासाठी जे आरक्षण जाहीर होईल त्यानूसार पक्षातील कार्यकर्त्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवून भुमरे यांनी सुत्रे मात्र आपल्याच हाती ठेवली होती.
हेही वाचा - हिंगोली : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद, जिल्ह्यासह परजिल्ह्यातील २३ दुचाकी जप्त
मागील पंचवीस वर्षाच्या कारकीर्दीत पाचोड ग्रामपंचायतीत मोठा कार्यकाळ भुमरे यांचाच राहिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यात भुमरे कॅबिनेट मंत्री असताना होणारी पाचोड ग्रामपंचायतीची निवडणूक अधिकच होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे व भुमरे यांच्या सख्या मामाची मुलं रणजित नरवडे व रणवीर नरवडे हे मैदानात उतरले आहेत.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास शेळके यांनी देखील भुमरेंच्या विरोधात पॅनल उतरवण्याची तयारी केली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे यांनी ही या निवडणुकीत नेत्यांच्या सांगण्यावरून विशेष लक्ष घातले आहे.तर भुमरे यांच्या विरोधात विधानसभा लढवलेले राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांनी देखील पाचोड ग्रामपंचायतीत विशेष रस दाखवला आहे. त्यामुळे भुमरेविरुध्द इतर सगळे पक्ष असे चित्र सध्या तरी पाचोड ग्रामपंचायतीत दिसत आहे.
(edited by- pramod sarawale)