ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावणारच - आमदार सुरेश धस 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी आणि गंगाखेडला आमदार सुरेश धस यांनी ऊसतोड कामगार आणि मुकादम यांच्यासोबत शनिवारी बैठका घेऊन चर्चा केली. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ऊसतोड कामगार, मुकादम यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी यावेळी दिली. 

जिंतूर, पाथरी, गंगाखेड (जि. परभणी) - ऊसतोड कामगार, मुकादम यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी जिंतूर येथील एका कार्यक्रमात बोलताना शनिवारी (ता. तीन) दिली. त्याचबरोबर आमदार धस यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि गंगाखेड येथेही बैठका घेऊन ऊसतोड कामगार आणि मुकादम यांच्यासोबत चर्चा केली व त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या.

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील माऊली मंगल कार्यालयात शनिवारी (ता. तीन) श्री. धस यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसतोड कामगार मुकादम यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ऊसतोड कामगार व मुकादम यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मजुरीवाढ, वाहतूक दरवाढ, मुकादम कमीशन वाढ, मजूर विमा या सर्व गोष्टी कारखान्यांना करण्यास भाग पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा ठेवून तुमच्यासोबत चर्चा करण्यास आलो असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - गुड न्यूज : मराठवाड्यातून तीन रेल्वे धावणार, प्रवाशांना दिलासा

ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत - बोर्डीकर
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिंतूर - सेलू मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने ऊसतोडणीला जातात. ते निश्चितच आपल्या पाठीशी राहतील. वेळप्रसंगी आंदोलनातही सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला; मात्र त्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. पंडित दराडे, भटके - विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष सखाराम राठोड, कैलास महाराज, दत्तात्रय कटारे, सुमेध सूर्यवंशी, अमोल देशमुख, माधव दराडे, प्रवीण कांदे, संतोष राठोड, विकास जाधव, प्रवीण कांदे, सचिन राठोड व परिसरातील ऊसतोड मुकादम उपस्थित होते. 

गंगाखेडला चर्चासत्राचे आयोजन
गंगाखेड - शहरातील कृष्णश्रेया मंगल कार्यालय येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे मजूर मुकदम व वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने ऊसतोड कामगार, मुकादम यांच्या चर्चासत्राचे आयोजन शनिवारी (ता. तीन) करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार सुरेश धस बोलत होते. आमदार धस म्हणाले की, ऊसतोड कामगार व मुकादम यांचे जे जे प्रश्न आहेत. ज्यामध्ये मजुर वाढ, वाहतूक दरवाढ, मुकादम कमीशन वाढ, मजूर विमा कारखान्याचे फायनल मिळावे, ह्या सर्व गोष्टी कारखान्यास करणे भाग पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कदम यांनी गंगाखेड, सोनपेठ व पालम भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आहेत. हे ऊस तोड कामगार ऊस तोडणीला जातात हे सर्व निश्चित आपल्या पाठीशी राहतील व वेळप्रसंगी आंदोलनात सहभागी होतील, असे मत व्यक्त केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठल रबदडे, व्यंकट तांदळे, बाबुराव पवार, बालाप्रसाद मुंदडा, रंगनाथ सोळंके, शिवाजी मोहाळे, नंदकुमार सुपेकर,कृष्णाजी सोळंके, सुशील रेवडकर श्रीनिवास मोटे, ॲड. आदीनाथ मुंडे, श्रीपाद कोद्रीकर, विशाल मुंडे, अतुल गंजेवार, जयदेव जोशी, बाळासाहेब गव्हाणकर आदी उपस्थित होते.  

हेही वाचलेच पाहिजे - कांद्याचे भाव वधारल्याने ” ये रे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या” असे म्हणण्याची वेळ

पाथरीतही चर्चासत्रात आमदार धस सहभागी
पाथरी - ऊस तोड कामगार व मुकादमांचे या अनेक प्रश्न असून ते सोडविल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. वेळ पडल्यास उसाचे एकही टिपरू तोडू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री सुरेश धस यांनी शनिवारी (ता. तीन) दिला. येथील संस्कार महाविद्यालयात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ऊस तोड कामगार मुकादम यांच्या आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहन फड तर व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.पी.डी. पाटील, विजू पाटील सिताफळे, विश्वनाथराव लाडाने, अरुण गवळी, तालुकाध्यक्ष शिवराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ऊसतोड मजूरांकडे सरकारचे दुर्लक्ष
श्री. धस म्हणाले की, महाराष्ट्रात ऊसतोड मजुरांचे अनेक प्रश्न आहेत त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. मजुर वाढ, वाहतूक दरवाढ, मुकादम कमिशन वाढ, मजूर विमा ह्या सर्व गोष्टी कारखान्याने करणे अनिवार्य आहे. परंतु मजुरांचे हे प्रश्न सोडवण्या ऐवजी राज्य सरकार कारखानदारांना खूष करत आहे. पण मी शांत बसणार नसून प्रसंगी उसाचे एक टिपरू ही तोडू देणार नाही असा इशारा धस यांनी सरकारला दिला. चर्चासत्राचे प्रस्ताविक विजू पाटील सिताफळे यांनी केले. यावेळी माजी आमदार मोहन फड, राज्य मुकदम संघटनेचे सचिव सुखदेव सानप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ राजेंद्र चौधरी, शामराव अण्णा गलबे, डॉ. विष्णू राठी, विठ्ठलराव चिंचने, नानासाहेब वाकणकर, रघुनाथ गुंजकर, दादाराव रासवे, परमेश्वर कदम, गोपाळराव डुकरे, रघुनाथ पाते, संजय देशमुख, पप्पू नखाते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालासाहेब तळेकर यांनी केले तर भागवत वाकणकर यांनी आभार मानले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Suresh Dhas will solve the problems of sugarcane workers, Parbhani news