मोर्चा, निदर्शनाने दणाणला परभणी जिल्हा 

PRB
PRB

परभणी ः कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या भारत बंदमध्ये विविध संघटना, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयासह खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत बंद यशस्वी केला. गुरुवारी (ता.२६) ठिकठिकाणी मोर्चा, निदर्शने, आंदोलन करत जिल्हा कामगारांनी दणाणून सोडला. 

हमाल माथाडी मजदूर युनियनचा भारत बंदमध्ये सहभाग 
गंगाखेड ः केंद्र शासनाने शेतीमालाच्या किफायतशीर भावाचा हिरावुन घेण्यासाठी चालवलेल्या शेतीमाल विक्री कायदा २०२० व अत्यावश्यक वस्तू कायदा २०२० कंत्राटी शेती कायदा प्रस्तावित विज बिल कायदा यासह विविध मागण्यांसाठी हमाल मापाडी मजदूर युनियन शाखा गंगाखेडच्या वतीने भारत बंदमध्ये सहभाग नोंदवून तहसील कार्यालय येथे (ता.२६) रोजी मोर्चा काढला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल माथाडी कामगारांसाठी असणाऱ्या माथाडी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, असा उल्लेख नियोजनावर केला. निवेदनावर शिवाजी कदम, शेख सरवर, रोहीदास बदाले, रमेश वाव्हळे, लाला साळवे, दारासिंग परकड, चंद्रकांत जाधव, परमेश्वर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

लेबर कोड रद्द करण्यासाठी भाकपचा मोर्चा 
परभणीः कामगार विरोधी लेबर कोड रद्द करावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने गुरुवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेती माल विक्री कायदा रद्द करावा, कंत्राटी शेती कायदा रद्द करावा, वस्तू (सुधारणा) कायदा रद्द करावा, प्रस्तावित विज कायदा रद्द करावा, राज्य सरकारचा स्वतंत्र कायदा अंमलात आणावा, परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई अदा करावी, बाधित क्षेत्रातील कापणी प्रयोग रद्द करावा, विमा भरपाई नाकारणाऱ्या रिलायन्स कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करावा आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व राजन क्षीरसागर यांनी केले. शनिवार बाजार मैदानापासून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात अॅड. माधुरी क्षीरसागर, शेख अब्दुल, अॅड. लक्ष्मण काळे, मुगाजी बुरुड, आसाराम बुधवंत यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. 

सेलूत माकपचे आंदोलन 
सेलू ः केंद्रातील मोदी सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी करत गुरुवारी (ता.२६) मार्कवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, कामगार विरोधी कायद्यातील बदल रद्द करावेत, तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई एकरी पन्नास हजार रुपये द्यावी, सर्व गरीबांना दोन रुपये किलोचे पिवळे रेशनकार्ड द्यावे, रेशनकार्डाचे विभक्तीकरण करावे, कोरोना काळातील विजबिल माफ करण्यात यावे तसेच, इन्कमटॅक्स न भरणाऱ्या सर्व कुटुंबांना दरमहा सात हजार पाचशे रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा अशा विविध या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना देण्यात आले. आंदोलनात रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, नारायण पवार, रोहीदास हातकडके, भास्कर कदम, शांतीराम पौळ, शिवाजी रणखांबे, दिलीप दौड, खंडू चव्हाण यांच्यासह नगर परिषद कामगार व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. 

बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने 
परभणी ः आपल्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपादरम्यान बीएसएनएलच्या कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता.२६) जोरदार निदर्शने केली. प्रशासकीय इमारतीजवळील बीएसएनएलच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी सकाळी साडेअकरा ते एकच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात संजय ढोबळे, ए.एम. बेग, पी.ए. खान, नारायण जोगदंड, लक्ष्मण वरकड, यशवंत चौधरी, गोपाळ पतंगे, अजीत शेंडे, श्रीमती सालेहा बेगम सहभागी झाले होते. 

राज्य सरकारी कर्मचारी व कामगारांची जोरदार निदर्शने 
परभणी ः आपल्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपादरम्यान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता.२६) जोरदार निदर्शने केली. केंद्र शासनाने गेल्या आठ महिन्यांतील कोरोना कालावधीत महामारीची ढाल पुढे करुन कामगार-कर्मचारी विरोधी कायदा अर्थ विषयक लाभांचा संकोच व सेवा विषयक बाबीत कर्मचारी जीवन विरोधी धोरणे, जाहीर करुन कर्मचा-यांच्या शाश्वत सेवाजीवनालाच आव्हान देण्याचा दुदैवी प्रयत्न केला आहे, अशी टिका याव्दारे करण्यात आली. राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश जोशी, सचिव प्रशांत सिरस, बी. आर. राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी, कर्मचारी निदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

शेतकरी कामगार पक्षाची निदर्शने 
परभणी ः शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करावे या मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने गुरुवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कॉर्पोरेट कंपन्याना खुश करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व अत्यावश्यक वस्तू कायद्यात केलेला बदल रद्द करावा, कामगारांना हक्कापासून वंचित ठेवणारे कामगार कायद्यातील बदल रद्द करावा, असंघटित व हमाल कामगारांना ५० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण द्यावे, शालेय पोषण आहार कामगारांना महिला दहा हजार रुपये मानधन द्यावे या मागण्या त्यांनी केल्या आहेत. हे आंदोलन भाई किर्तीकुमार बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी भाई एल.डी.कदम, सूर्यंकात भिसे, शिवाजीराव सावळे, सुरेश लबडे, बाबा कदम, पिराजी सावळे परमेश्वर शिंदे, सुंदर आगलावे, बंडू नितनवरे आदी सहभागी झाले होते. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com